October 14, 2025

पुणे: गावभर खड्डे अन महापालिकेचा हॉट मिक्स प्रकल्प बंद

पुणे, ०१/०८/२०२४: पावसामुळे रस्त्यावर पडणारे खड्डे दुरूस्त करण्यासाठी वापरण्या येणार्‍या हॉट मिक्स चा येरवडा येथील प्रकल्प ऐन पावसाळ्यात बंद पडला आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यावर पावसामुळे पडलेल्या खड्डे दुरुस्तीचे काम मंदावले आहे. दरम्यान, महापालिका आयुक्तांनी शिंदेवाडी व वारडे येथे हॉट मिक्सचे नवीन प्रकल्प उभारण्यास मंजुरी दिल्याची माहिती पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी दिली.

महापालिकेचा येरवडा येथे एकमेव 120 टनाचा हॉट मिक्स प्रकल्प आहे. या प्रकल्पामधून रोज 450 टन खडी मिश्रित डांबर तयार होते. त्यापैकी 150 टन 15 क्षेत्रीय कार्यालयात प्रत्येकी दहा टन यानुसार दिले जाते. तर उर्वरित डांबर पथ विभागामार्फत खड्डे बुजविणे, रस्ता डांबरीकरणासाठी वापरण्यात येते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हा प्रकल्प बंद आहे. त्यामुळे येथून डांबर उपलब्ध होत नसल्याने पालिकेच्या खड्डेदुरुस्तीवर परिणाम झाला आहे. त्यातच सातत्याने पाऊस पडत असल्याने शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे दिसत आहेत.

दरम्यान, येरवडा येथील प्रकल्प जुना असल्याने तो वारंवार बंद पजतो. त्यामुळे दोन नवीन प्रकल्प उभारण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. सातारा रस्त्यावरील शिंदेवाडी येथे एक व शहराच्या पश्चिम भागात वारजे येथे एक असे प्रत्येकी 160 टनाचे दोन प्रकल्प उभारले जाणार आहेत. यासाठी प्रत्येकी साडेचार कोटी रुपये खर्च येणार असून, त्यासाठीच्या पूर्वगणनाला (एस्टिमेट) मान्यता देण्यात आली आहे. यानंतर आयुक्तांनीही या प्रस्तावाला मान्यता दिली असून लवकरच निविदाप्रक्रिया सुरू होईल. कार्यादेश निघाल्यानंतर तीन महिन्यात हे प्लांट उभारणीचे काम पूर्ण होईल, असे दांडगे यांनी सांगितले.

केवळ 40 खड्डे दुरुस्त करणे बाकी:
महापालिकेच्या पथ विभागाने दिलेल्या माहितीनुसार 1 मार्चपासून 31 जुलैपर्यंत शहरात 8 हजार 418 खड्डे आढळले असून त्यापैकी 8 हजार 378 खड्डे दुरुस्त करण्यात आले आहेत. आता केवळ 40 खड्डे दुरुस्त करणे बाकी असून 250 चेंबरची दुरुस्त करण्यात आली आहे.