पुणे, १३ ऑक्टोबर २०२५: शहरात अनधिकृत फ्लेक्स लावून आगामी निवडणुकीसाठी जाहिरात करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना आता ही चूक महागात पडू शकते. उमेदवारी अर्ज भरताना उमेदवाराने फ्लेक्सचा दंड भरला आहे की नाही, हे प्रशासन तपासणार आहे. या संदर्भातील ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) नसल्यास अर्ज बाद होऊ शकतो. फ्लेक्सबाजी थांबवण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृत फ्लेक्स, बॅनर लावून जाहिरातबाजी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शिक्षण संस्था, खासगी शिकवणी, बांधकाम व्यावसायिक आणि इतर व्यावसायिक यांच्यासोबत आता राजकीय नेतेही मोठ्या प्रमाणावर फ्लेक्सबाजी करत आहेत. महापालिका निवडणुका जवळ आल्याने चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी नेत्यांचे शुभेच्छा व जाहिरातींचे फ्लेक्स झळकत आहेत. त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी गेल्या आठवड्यात अनधिकृत फ्लेक्स व बॅनर हटविण्याचे आदेश दिले. त्यानंतर महापालिकेच्या कारवाईत शहरातील विविध भागांमधून तीन हजारांहून अधिक फ्लेक्स व बॅनर हटविण्यात आले आहेत. तसेच २६ जणांवर शहर विद्रूपीकरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तरीही फ्लेक्सबाजीचा उत्साह कमी झालेला नाही. दररोज नवीन फ्लेक्स लावले जात आहेत.
महापालिकेतर्फे अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांवर प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड आकारला जातो. मात्र, अनेक कार्यकर्ते आणि राजकीय व्यक्ती या दंडाकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळेच प्रशासनाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता कडक भूमिका घेतली असून उमेदवारांकडून फ्लेक्सचा दंड भरल्याचे प्रमाणपत्र घेण्याचा निर्णय घेतला आहे.
फ्लेक्स लावणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांकडून योग्य दंड वसुल होत नसल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. काही वेळा क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी दाखविण्यासाठी फक्त एका फ्लेक्सवर दंड ठोठावतात आणि उर्वरित फ्लेक्सकडे दुर्लक्ष करतात. अलीकडेच सिंहगड रस्त्यावरील एका माननीयांचा वाढदिवस झाला. वाढदिवसाच्या तीन दिवस आधी संपूर्ण परिसरात फ्लेक्स लागले होते, पण त्यांच्यावर कारवाई वाढदिवस झाल्यानंतरच करण्यात आली. यामुळे कर्मचाऱ्यांकडूनच काही फ्लेक्सबाजीला अभय मिळत असल्याची चर्चा आहे.
महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त माधव जगताप म्हणाले, “महापालिका निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने अनधिकृत फ्लेक्सचा दंड भरला नसल्यास त्याला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येणार नाही. अशा उमेदवारांचा अर्ज बाद केला जाऊ शकतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.
More Stories
पुणे: पालिकेचा दिवाळी बचत बाजार गजबजला – दोन दिवसांत १९ लाखांची विक्री
Pune: नागरिकांच्या समस्या निराकरणासाठी पीएमआरडीएची तालुकानिहाय ९ क्षेत्रीय कार्यालये सुरु
Pune: पुणे महापालिका बांधकाम स्थळांवर सेन्सर-आधारित धुलीकण नियंत्रण कडक करणार