December 14, 2024

पुणे: हडपसरमध्ये अवैधरित्या इंधनविक्रीचा पर्दाफाश , २ कोटी २८ लाखांचा ऐवज जप्त

पुणे, दि. ९/०४/२०२३: अवैधरित्या पेट्रोल व डिझेल चोरी करणार्‍या टोळीचा हडपसर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून २ कोटी २८ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. त्यामध्ये २४ हजार लीटर इंधन, आठ टँकर, १४ कॅन अशा ऐवजाचा समावेश आहे .

सुनिलकुमार प्राननाथ यादव (वय २४ रा. हडपसर, मुळ रा.प्रतापगढ, लालगंज, उत्तरप्रदेश) दाजीराम लक्ष्मण काळेल (वय ३७ मूळ- वळई ता. माण, सातारा ) सचिन रामदास तांबे (वय ४० रा. हडपसर), शास्त्री कवलु सरोज (वय ४८ रा.हडपसर), सुनिल रामदास तांबे (वय ३८ रा. हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

हडपसर पोलीस ८ एप्रिलला हद्दीत पेट्रोलींग करीत असताना, पोलीस अंमलदार मनोज सुरवसे यांना अवैध इंधन विक्रीची माहिती मिळाली. वाशी नवी मुंबई येथुन एटीफ पेट्रोल (विमानासाठी वापरण्यात येणारे पेट्रोल) डिझेल भरुन टँकर शिर्डी एअरपोर्ट कडे जाणार होते. संबंधित टँकर कंपनीकडुन प्रवासाचा मार्ग वेळ नियोजीत आणि टँकरला अ‍ॅटोलॉक असतानाही आरोपींकडून इंधनाची चोरी होत होती.

पथकाने हडपसर परिसरात छापा टाकला असता, आरोपी टँकरमधून ंइंधनाची चोरी करताना मिळून आले. त्याठिकाणाहून दोन भरलेले इंधन टँकर, आठ मोकळे टँकर, १४ कॅन असा २ कोटी २८ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला .एचपीसीएल कंपनीचे अधिकार्‍यांसह पोलिस अधिकारी मिळून पंचनामा केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी सांगितले. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त रंजनकुमार शर्मा एसीपी बजरंग देसाई, वरिष्ठ निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे, विश्वास डगळे, एपीआय विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे यांनी केली.