September 17, 2024

पुणे: पत्रकार गोळीबार प्रकरणात मुख्य आरोपीस बंगळुरुमधून अटक

पुणे, २४/०६/२०२३: जमिनीच्या व्यवहारातील वादातून पत्रकारावर गोळीबार केल्या प्रकरणी मुख्य आरोपीला पोलिसांनी बंगळुरूमधून अटक केली. या प्रकरणात आतापर्यंत सहा अल्पवयीन मुलांसह तेरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

श्रेयस अप्पा मते (वय २१, रा. नांदेड गाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मते याला ताब्यात घेऊन पोलिसांचे पथक शनिवारी पुण्यात पोहोचले. सुपारी घेऊन मते आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला केला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. शहरातील एका दैनिकाच्या उपनगर वार्ताहरावर ११ जून २०२३ रोजी स्वारगेट भागातील महर्षीनगर परिसरात गोळीबार करण्यात आल होता. या प्रकरणात आतापर्यंत स्वारगेट पोलिसांनी सात जणांना अटक केली. अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. सिंहगड रस्त्यावरील जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती तपासात मिळाली आहे.

या प्रकरणी प्रथमेश ऊर्फ शंभू धनंजय तोंडे (वय २०, रा. राजेंद्रनगर, नवी पेठ) आणि अभिषेक शिवाजी रोकडे (वय २२, रा. नांदेड गाव) यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर अकरा जणांना ताब्यात घेण्यात आले होते. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मते पोलिसांना गुंगारा देत होता. तो बंगळुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला सापळा लावून पकडण्यात आले. त्याच्या विरुद्ध यापूर्वी खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.