पुणे, ५ जून २०२५: कोथरूडमधील वनाज सोसायटीत गुरुवारी दुपारी २.३४ वाजता मीटर रूममध्ये आग लागल्याची घटना घडली. ही आग डक्टमधील वायरिंगपर्यंत पसरली आणि इमारतीच्या सातव्या, आठव्या आणि नवव्या मजल्यावरील पॅसेजमध्ये मोठ्या प्रमाणावर धूर व उष्णतेचा प्रसार झाला. यामुळे या मजल्यांवरील पॅसेजमधील वायरिंग व डोअर बेल पूर्णपणे वितळल्याचे आढळले.
आगीवर नियंत्रण मिळवून अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ सर्व मजल्यांवरील फ्लॅट्समध्ये कोणी अडकले आहे का याची पाहणी केली. वरच्या मजल्यांवरील काही रहिवासी बाल्कनीत अडकलेले होते, त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. तपासात समोर आले की, तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहणाऱ्या चौघांनी आग लागल्याने घाबरून त्यांनी दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीत उडी मारली. यामध्ये मृण्मयी कालेकर (१७) हिला पायाला दुखापत झाली. तसेच लक्ष्मण पडवळ (८५) हे जिना उतरत असताना पाय घसरून जखमी झाले. या घटनेत सुप्रिया कालेकर (४५), आरोही कालेकर (१२), मृण्मयी आणि मैथिली या जुळ्या बहिणी (१७) यांचा समावेश होता.
या आगीत इमारतीतील एकूण २४ वायर मीटर जळाले असून डक्टमधील संपूर्ण वायरिंगही जळले आहे. या कारवाईत प्रभारी अधिकारी सुनील नामे, ड्रायव्हर दत्ता गोगावले, ज्ञानेश्वर बाठे, तांडेल चंद्रकांत गावडे, अमोल पवार, फायरमन शंकर वाबळे, शिवकुमार माने, मनोज गायकवाड, संतोष भोसले आणि योगेश लोखंडे यांनी सहभाग घेतला.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही