January 16, 2026

पुणे: येरवड्यातील गुंड टोळीविरुद्ध मोक्का कारवाई

पुणे, ०९/०९/२०२३: येरवडा भागात दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (माेक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील ५८ गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई केली आहे.

टोळीप्रमुख हुसेन उर्फ सोन्या युनूस शेख, वसीम हैदरअली भोगले (वय २२), अमिर उर्फ शंक्या युनूस शेख (वय १८, दोघे रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांच्यासह सहाजणांविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे. टोळीप्रमुख हुसेन आणि तीन साथीदार पसार आहेत. वसीम भोगले, अमिर शेख यांना अटक करण्यात आली आहे. येरवडा भागातील इराणी मार्केट परिसरात हुसेन शेख आणि साथीदार रुपेश राजगुरू यांनी जुने भांडण मिटवण्यासाठी एकाकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी देण्यास नकार दिल्याने आरोपींनी तरुणावर हल्ला केला होता.

टोळीप्रमुख शेख आणि साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा आणणे, घरफोडी, दुखापत करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे शाखेच्या निरीक्षक कांचन जाधव यांनी तयार केला होता. अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी प्रस्तवाची पडताळणी केली. सहायक आयुक्त संजय पाटील तपास करत आहेत.