September 17, 2024

पुणे: स्वारगेट भागात दहशत माजविणाऱ्या गुंडावर ‘एमपीडीए’, कोल्हापुरातील कारागृहात रवानगी

पुणे, २६/०४/२०२३: स्वारगेट भागातील गुलटेकडी परिसरात दहशत माजविणाऱ्या गुंडाच्या विरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले. गुंडाला वर्षभरासाठी कोल्हापुरातील कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने आतापर्यंत शहरातील दहा गुंडांच्या विरुद्ध एमपीडीए कारवाई करण्यात आली आहे.

सैफअली वाहिद बागवान (वय २०, रा. इंदिरानगर वसाहत, गुलटेकडी) असे कारवाई केलेल्या गुंडाचे नाव आहे. बागवान याच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न, दहशत माजविणे, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. त्याच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार करत नव्हते. बागवान याच्या विरुद्ध एमपीडीए कारवाई करण्याचा प्रस्ताव स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, गुन्हे प्रतिबंध शाखेच्या पोलीस निरीक्षक सुरेखा वाघमारे यांनी तयार केला होता. या प्रस्तावास पोलीस आयुक्त रितेेश कुमार यांनी नुकतीच मंजूरी दिली.