October 14, 2025

पुणे महापालिका आयुक्तांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भेट टाळली

पुणे, २० फेब्रुवारी २०२५: पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या भूमिका वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसत आहेत. नुकतेच आयुक्तांनी विधान भवनात त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पायघड्या घालून अर्थसंकल्पासाठी बैठक घेतली. त्यात शेकडो कोटी रुपयांचा निधी भाजपच्या आमदार, माजी नगरसेवकांना दिला जाणरा आहे. त्यामुळे शहरातील राजकारण तापलेले आहे. तर दुसरीकडे आज आयुक्तांनी शिवसेना शहर प्रमुख आणि त्यांच्या नेत्यांची भेट टाळली. पुणे शहर शिवसेनेला भेट न देता आयुक्तांनी चक्क महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. असा आरोप करत शिवसेना नेत्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. यावरुन देखील आता राजकारण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

शहराच्या आणि आपल्या परिसरातील विकास कामांबाबत राजकीय लोक महापालिका आयुक्तांची भेट घेतात. त्यासाठी राजकीय नेते आयुक्तांची रीतसर वेळ घेतात. त्यानुसार वेळ ठरवून बैठक घेतली जाते आणि विविध विषयावर चर्चा केली जाते. मात्र आज शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे आणि त्यांच्या नेत्यांना वेगळाच अनुभव आला. आपल्या विविध विषयाबाबत आयुक्तांची भेट घेण्यासाठी या नेत्यांनी आयुक्तांना संपर्क केला. मात्र आयुक्तांनी आजारी असल्याचे कारण देत भेट टाळली.

तर दुसरीकडे आयुक्तांनी आजच महाविकास आघाडीतील नेत्याना वेळ देत त्यांच्या सोबत बैठक घेतली. विधान भवनात तयार होणाऱ्या बजेट वरून आयुक्तांना यावेळी निवेदन देत आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला. मात्र शिवसेना नेत्यांची भेट टाळली. यामुळे आता विविध चर्चांना उधाण आले आहे. शिवाय यावरुन शहराचे राजकारण तापण्याची देखील चिन्हे आहेत.

शिवेसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे म्हणाले, ‘‘विविध विषयाबाबत मी आणि आमच्या पदाधिकाऱ्यांना आयुक्तांची भेट हवी होती. मात्र वारंवार संपर्क करूनही आयुक्तांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर आयुक्तांनी आजारी असल्याचे कारण दिले. आमच्यासोबत असा दुजाभाव करून दुसरीकडे महाविकास आघाडी च्या नेत्यांसोबत मात्र आयुक्तांनी बैठक घेतली. आयुक्तांची ही भूमिका आम्हाला न पटणारी आहे.’’