March 3, 2026

Pune: खराडी, सय्यद नगर, सदाशिव पेठेत महापालिकेचा बुलडोझर

पुणे, १७ फेब्रुवारी २०२६ : शहरातील अनधिकृत बांधकामांवर आज पुन्हा एकदा महापालिकेने बुलडोझर फिरवत मोठी कारवाई केली. पुणे महानगरपालिका प्रशासनाने सकाळी नऊ वाजल्यापासून खराडी–नवीन हडपसर (सय्यद नगर) आणि सदाशिव पेठ परिसरात संयुक्त धडक मोहीम राबवत तब्बल १७,५०० चौरस फूट कच्चे–पक्के अनधिकृत शेड आणि बांधकामे जमीनदोस्त केली.
महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार उपआयुक्त सोमनाथ बनकर आणि मुख्य सुरक्षा अधिकारी डॉ. रमेश शेलार यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई पार पडली. बांधकाम विकास विभागाच्या अधिकाऱ्यांसह अतिक्रमण निरीक्षक आणि अभियंते यांच्या उपस्थितीत पथके थेट घटनास्थळी उतरली.
मोठा फौजफाटा, थेट कारवाई
कारवाईसाठी १६ मनपा पोलीस, २५ एमएसएफ जवान, ५ जेसीबी, ५ गॅसकटर, ४ ब्रेकर आणि ४५ विगारी सेवकांचा ताफा तैनात करण्यात आला होता. सकाळपासूनच परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते; मात्र प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई पूर्ण केली.
१८५ अतिक्रमणांवर घाव
शहरभरात आजच्या मोहिमेत एकूण १८५ अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.
•हातगाड्या – ६
•पथाऱ्या – ९४
•काउंटर – ५
•इतर अतिक्रमणे – ७२
•गॅस सिलेंडर – ८
बांधकाम विकास विभागासोबत संयुक्त कारवाई करत आकाशचिन्ह विभागालाही मदत देण्यात आली.
प्रशासनाचा इशारा
अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांबाबत महापालिकेने स्पष्ट इशारा दिला असून, शहरात कुठेही नियमबाह्य बांधकाम आढळल्यास अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन आक्रमक भूमिकेत असून, येत्या काळात आणखी मोठ्या मोहिमा राबवल्या जाण्याची शक्यता आहे.