October 14, 2025

Pune: अनधिकृत फ्लेक्सबाजीवर महापालिकेची कडक कारवाई २७ जणांवर गुन्हे दाखल

पुणे, ८ ऑक्टोबर २०२५ : शहरात अनधिकृतपणे लावण्यात येणाऱ्या फ्लेक्स, बोर्ड आणि बॅनरविरोधात पुणे महानगरपालिकेने मोठी मोहीम सुरू केली आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर आकाशचिन्ह विभागाने कारवाईला गती दिली आहे.

आज (ता. ८) रोजी एका दिवसातच १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत ७१ तक्रारी पोलिस ठाण्यांना पाठवण्यात आल्या असून, २७ प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात अनधिकृत फ्लेक्स हटविण्यात आले आहेत.

शहरात राजकीय नेत्यांचे वाढदिवस, नियुक्त्या, शुभेच्छा संदेश, तसेच विविध बांधकाम प्रकल्प, शिकवणी, शैक्षणिक संस्था व व्यावसायिक जाहिरातींमुळे फ्लेक्सबाजीचे प्रमाण वाढले आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुक उमेदवार स्वतःचा प्रचार करण्यासाठी फ्लेक्स लावत आहेत, ज्यामुळे शहराचे सौंदर्य विद्रूप होत आहे.

आयुक्त नवल किशोर राम यांनी अलीकडे घेतलेल्या बैठकीत परवानगीशिवाय लावलेल्या फ्लेक्स, बोर्ड आणि बॅनरवर थेट गुन्हे दाखल करण्याचे, तसेच प्रत्येक प्रकरणात १,००० रुपयांचा दंड आकारण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, प्रिंटिंग प्रेस व्यावसायिकांनी कोणताही फ्लेक्स किंवा बोर्ड छापण्यापूर्वी महापालिकेची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांत सुमारे अडीच हजार अनधिकृत फ्लेक्स आणि बॅनर काढून टाकले गेल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली. त्यांनी सांगितले की, केवळ फ्लेक्स हटविण्यापुरतीच नव्हे तर दंडात्मक व गुन्हेगारी कारवाई सुरू करण्यात आली आहे.

गुन्हे दाखल झालेल्या क्षेत्रांची यादी :
नगर रस्ता – ६
औंध-बाणेर – ४
कोथरूड-बावधन – २
वारजे-कर्वेनगर – ३
कोंढवा–येवलेवाडी – १
कसबा–विश्रामबाग – ४
बिबवेवाडी – ७

जबाबदारी ठरवली जाणार
शहरात अनधिकृत फ्लेक्स लावले गेल्यास संबंधित क्षेत्रीय सहाय्यक आयुक्त जबाबदार असतील, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे. त्यांच्या हद्दीत नियमभंग आढळल्यास त्यांच्यावरही प्रशासकीय कारवाई होणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे.