April 24, 2024

पुणे: बिबवेवाडी भागात अनोळखी व्यक्तीचा खून

पुणे, ०८/०७/२०२३: बिबवेवाडी भागातील सरगम चाळ परिसरात मोकळ्या जागेत अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खून झालेल्या व्यक्तीची ओळख पोलिसांकडून पटविण्यात येत आहे.

खून झालेल्या व्यक्तीचे वय अंदाजे ४५ ते ५० वर्ष आहे. पोलीस उपनिरीक्षक बाळू शिरसट यांनी याबाबत बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर भागात सरगम चाळ आहे. चाळीतील मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पडल्याची माहिती रहिवाशांनी पोलिसांना दिली. मृतावस्थेत सापडलेल्या व्यक्तीच्या डोक्यात कठीण वस्तू मारुन खून करण्यात आल्याचे उघडकीस आले.

खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नसून, पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे तपास करत आहेत.