June 24, 2024

पुणे: डेक्कन कॉलेजमध्ये राष्ट्रिय संस्कृत दिवस संपन्न

पुणे, ०८/०९/२०२३: डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था, अभिमत विद्यापीठाच्या संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या वतीने यावर्षीचा राष्ट्रिय संस्कृत दिन, बुधवार ६ सप्टेंबर २०२३ रोजी साजरा करण्यात आला. या दिवशी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संस्कृत लघुचलच्चित्रफित स्पर्धेमध्ये संस्कृतभारती पारितोषिकप्राप्त सन्धानम्, देयं दीनजनाय च वित्तम् आणि स्वरामृदुलादयः या चित्रफितींचे प्रदर्शन करण्यात आले.

यासोबतच विद्यार्थांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डेक्कन कॉलेजचे उपकुलगुरू आणि संस्कृत आणि कोशशास्त्र विभाग प्रमुख माननीय प्रा. प्रसाद जोशी हे होते. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पुणे आकाशवाणीच्या कार्यक्रम अधिकारी श्रीमती नीलिमा पटवर्धन उपस्थित होत्या.

त्यांनी ‘संस्कृत आणि प्रसार माध्यमे’ या विषयावर विशेष व्याख्यान दिले. त्यांनी प्रसार माध्यमांचे वेगवेगळे प्रकार, त्यामध्ये संस्कृत भाषेचा उपयोग, त्यांचे स्वतःचे एक संस्कृत तज्ञ म्हणून आकाशवाणी कार्यक्रम निष्पादक म्हणून आलेले अनुभव आणि संस्कृत भाषेचा त्यांना झालेला फायदा तसेच संस्कृतच्या विद्यार्थ्यांना प्रसार माध्यमांमध्ये असलेल्या रोजगाराच्या संधी त्याविषयी मार्गदर्शन केले. प्रा.प्रसाद जोशी सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भाषेवर होणारा प्रसारमाध्यमांचा परिणाम यावर भाष्य केले.

या प्रसंगी पुण्यातल्या विविध संस्थेचे विभागप्रमुख आणि विद्यार्थी उपस्थित होते तसेच डेक्कन कॉलेजचे सर्व शिक्षक, आणि सर्व विभागातील विद्यार्थी सहभागी झाले होते. अशी माहिती कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ.वृषाली भोसले, सहाय्यक प्राध्यापक, संस्कृत आणि कोशशास्त्र विभाग ,डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था, अभिमत विद्यापीठ, यांनी दिली आहे.