July 24, 2024

पुणे: बावधन भागात प्रवासी बस उलटली, नऊ प्रवासी जखमी

 पुणे, १९/०३/२०२३: मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर बावधन सीएनजी पेट्रोल पंपानजीक शनिवारी मध्यरात्री खासगी प्रवासी बस उलटून अपघात झाला. अपघातात सात ते नऊ प्रवासी जखमी झाले.

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरुन मध्यरात्री एकच्या सुमारास बंगळुरूकडे प्रवासी वाहतूक करणारी आराम बस निघाली होती. बसमध्ये ३६ प्रवासी होते. बावधन भागातील सीएनजी पेट्रोल पंपाजवळ बसचालकाचे नियंत्रण सुटले आणि बस सुरक्षा कठडा तोडून सेवा रस्त्यावर उलटली. बसमध्ये प्रवासी एकमेकांवर पडल्याने त्यांना दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख शिवाजी मेमाणे आणि जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. अपघातात सात ते नऊ प्रवासी जखमी झाले. त्यांना तातडीने बावधन येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.