October 14, 2025

Pune: रस्ता न दिल्याने पीएमआरडीएकडून दोन विकासकांची बांधकामे थांबवली

पुणे, ९ आॅक्टोबर २०२५ : सदनिकाधारकांना येण्या-जाण्यासाठी आवश्यक रस्ता आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध न करून दिल्याने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) माण (ता. मुळशी) येथील दोन विकासकांची बांधकामे थांबवण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी तक्रारींच्या पार्श्वभूमीवर घेतला.

पाठक रोड, माण येथील गृहप्रकल्पातील नागरिकांनी “रस्ता उपलब्ध नाही” अशी तक्रार पीएमआरडीएकडे केली होती. त्यानुसार विकास परवानगी आणि नियोजन विभागाने स्थळ पाहणी करून नागरिक व विकासकांची संयुक्त बैठक घेतली. त्यात त्वरित रस्ता उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने मे. जॉयव्हिले शापूर्जी हाऊसिंग प्रा. लि. आणि मे. येलोस्टोन स्कायस्क्रेपर्स एलएलपी या विकासकांची कामे थांबविण्यात आली आहेत.

दरम्यान, मुळशी तालुक्यातील भुगाव येथील ‘द वन सहकारी गृहरचना संस्था मर्या.’ परिसरात मुख्य रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना अडचणी येत असल्याच्या तक्रारींवरही पीएमआरडीएने कारवाई केली आहे. स्थळ पाहणीत अतिक्रमण आढळून आल्याने संबंधितांवर फौजदारी गुन्हे नोंदविण्याचे निर्देश महानगर आयुक्त डॉ. म्हसे यांनी दिले आहेत.