January 18, 2026

पुणे: ज्येष्ठ नागरिकाचे संरक्षण करणाऱ्या अंमलदाराच्या घरी पोलीस आयुक्त अमितेश कुमारांची भेट

पुणे, १३ जानेवारी २०२५: दोन दिवसांपूर्वी एका भांडणात हस्तक्षेप केल्याने एका पोलीस कर्मचाऱ्याला एका युवकाने मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी त्वरित आरोपीला ताब्यात घेतले. अंमलदाराच्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला.

११ जानेवारीला हडपसर परिसरात एक युवक एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करत होता. हडपसर वाहतूक विभागातील पोलीस अंमलदार राजू पवार यांनी ही घटना पाहिली आणि हस्तक्षेप केला. रागाच्या भरात आरोपीने कॉन्स्टेबल पवार यांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमात तुफान व्हायरल झाला, ज्यामुळे आरोपीविरुद्ध समाजमाध्यमात संतप्त प्रतिक्रिया आणि पोलिसांच्या स्वतःच्या संरक्षण क्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित झाले.

हडपसर पोलिसांनी त्वरित आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर, पुणे शहर पोलीस प्रमुख अमितेश कुमार यांनी अंमलदार पवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी पवार यांच्या सतर्कतेचे कौतुक केले आणि त्यांच्या कृतीबद्दल त्यांचा सन्मान केला.

कुमार यांनी पोलीस आणि नागरिक हे दोघेही समाजाचे अविभाज्य घटक असल्याचे स्पष्ट केले. नागरिक हे साध्य वेशातील पोलीसच आहेत, असे ही ते म्हणाले. त्यांनी सर्वांना आपल्या शहरासाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले. पुणे पोलिसांनी कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसावर कोणीही हात उगारल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.