July 25, 2024

पुणे: वाघोलीत लाॅजमध्ये वेश्याव्यवसाय, बांगलादेशी तरुणीसह चौघी ताब्यात

 पुणे, ०२/०३/२०२३: नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात एका लाॅजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी बांगलादेशी तरुणीसह चौघींना ताब्यात घेतले. या प्रकरणी लाॅज व्यवस्थापकासह दलालांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी लिंबाजी सखाराम वाघमारे (वय २९, रा. आळंदी फाटा, लाेणीकंद), प्रवीण शेखर पुजारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघमारे याला अटक करण्यात आली आहे. पोलीस हवालदार मनीषा पुकाळे यांनी या संदर्भात लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात जयभवानी लाॅज येथे वेश्याव्यवसाय करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी एका बांगलादेशी तरुणीसह चौघींना ताब्यात घेतले. बांगलादेशी तरुणीसह ताब्यात घेण्यात आलेल्या पश्चिम बंगालमधील तीन तरुणींना न्यायालयाच्या आदेशाने हडपसरमधील निरीक्षणगृहात ठेवण्यात आले.

आरोपी वाघमारे आणि पुजारी यांनी तरुणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अश्विनी पाटील, राजेंद्र कुमावत, मनीषा पुकाळे, तुषार भिवरकर, हणुमंत कांबळे आदींनी ही कारवाई केली.