October 14, 2025

Pune: पुणे महापालिका बांधकाम स्थळांवर सेन्सर-आधारित धुलीकण नियंत्रण कडक करणार

पुणे , १० ऑक्टोबर २०२५: बांधकाम प्रकल्पांमधून होणाऱ्या धुलीकणांच्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी पुणे महापालिकेने कडक भूमिका घेतली आहे. आयुक्त नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार, सर्व बांधकाम स्थळांवर वायू गुणवत्ता तपासण्यासाठी सेन्सर-आधारित मॉनिटरिंग प्रणाली लावणे बंधनकारक केले गेले आहे.

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम), पाषाणमार्फत सर्व सेन्सर उपकरणांची वैज्ञानिक पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. सेन्सर तपासणी पूर्ण न झाल्यास कोणत्याही प्रकल्पाला परवानगी दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आयुक्तांनी दिला आहे.

महापालिकेच्या पर्यावरण विभाग, बांधकाम परवाना विभाग आणि डब्ल्यू.आर.आय. इंडिया यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय अंतिम करण्यात आला. क्रेडाई, नारेडको, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना आणि सेन्सर उत्पादक प्रतिनिधींना समाविष्ट करून टास्क फोर्स कमिटी स्थापन केली असून पुढील अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार केला गेला आहे.

या प्रणालीद्वारे बांधकाम स्थळांवरील पीएम २.५ आणि पीएम १० धुलीकणांचे प्रमाण रिअल-टाइममध्ये तपासता येणार असून, प्रदूषण पातळी जास्त असल्यास त्वरित सुधारात्मक उपाययोजना करता येणार आहेत. सर्व माहिती केंद्रीकृत मॉनिटरिंग डॅशबोर्डवर उपलब्ध होणार आहे. पुणे महापालिका शहरातील वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि नागरिकांना स्वच्छ हवा उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.