October 14, 2025

Pune: औंध–बाणेर परिसरात ६० अनधिकृत शेडवर धडक कारवाई

पुणे,१० ऑक्टोबर २०२५: औंध–बाणेर क्षेत्रिय कार्यालय हद्दीत दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी अतिक्रमण निर्मूलन आणि बांधकाम विभागाच्या संयुक्त कारवाईत परिहार चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील जवळपास ६० अनधिकृत शेड, हॉटेल, दुकाने व कच्चे पक्के बांधकाम ताब्यात घेतले गेले.

संयुक्त पथकात बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता कामिनी घोलप, महाराष्ट्र सुरक्षा बल, पोलीस कर्मचारी, बिगारी सेवक आणि अतिक्रमण निरीक्षक राहुल बोकन, वैभव जगताप, राहुल डोके, हाशम पटेल, पंकज आवाड यांचा समावेश होता. कोथरूड-बावधन व घोलेरोड-शिवाजीनगर अतिक्रमण विभागाने देखील मदत केली.

सुमारे ९,५०० चौरस फूट क्षेत्र रिक्त करून ३ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले, ज्यामध्ये तंबू, लोखंडी जाळ्या, फ्रिज, काउंटर, स्टॉल इत्यादी समाविष्ट आहेत. अतिक्रमण निर्मूलन विभाग उपआयुक्त संदीप खलाटे व महापालिका सहायक आयुक्त गिरीश दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

अतिक्रमण निरीक्षक राहुल बोकन यांनी सांगितले की, अनधिकृत अतिक्रमणांवर यापुढे देखील नियमित व कठोर कारवाई सुरू राहणार आहे.