पुणे, 28/11/2025: ‘रिव्हर वीक’ (नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा) आणि २ डिसेंबर रोजी साजरा होणारा “राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस” यांच्या निमित्ताने पुणे महापालिकेतर्फे विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहयोगाने “नदी महोत्सव – स्वच्छ नदी, सुंदर पुणे” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा महोत्सव रविवार, ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते १० या वेळेत भिडे पूल ते म्हात्रे पूल या नदीपट्ट्यात पार पडणार असून यावेळी व्यापक नदी स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. पुणे महानगरपालिका, युथ फॉर अॅक्शन, इकोसन सर्व्हिसेस फाउंडेशन, जीवितनदी – लिव्हिंग रिव्हर फाउंडेशन यांसह इतर सामाजिक संस्था या उपक्रमात सहभागी होणार आहेत. सामान्य नागरिकांसाठीही मोफत सहभागाची व्यवस्था आहे.
महोत्सवात नदी स्वच्छता मोहिम, पथनाट्य, ड्रम-सर्कल्स, तसेच पर्यावरणविषयक जनजागृती स्टॉल्स असे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पुणे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, तसेच पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम होणार असून नागरिकांनी खालील लिंकवर नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे:
https://forms.gle/vu4Ch33pn3Q7vinH7
महापालिका आयुक्त नवल किशोर राम म्हणाले,” या उपक्रमासाठी भिडे पूल ते म्हात्रे पूल या नदीपट्ट्याला ९ झोनमध्ये विभागण्यात आले असून, प्रवेशासाठी दोन प्रवेशद्वारे ठेवण्यात आली आहेत.” नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
महत्त्वाचे नियम :
झोन १, २, ३ : प्रवेश — बाबा भिडे पूल
झोन ४, ५, ६ : प्रवेश — खुडे पथ
सहभागींनी आपल्या नेमून दिलेल्या झोनमध्येच स्वच्छता करावी.
प्रत्येक झोनमध्ये हातमोजे आणि मास्क उपलब्ध करून देण्यात येतील.
बॅरिकेड केलेल्या भागात किंवा नदीमध्ये उतरण्यास मनाई आहे.
सुरक्षिततेसाठी बंद बूट परिधान करावेत.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही