December 8, 2025

Pune: केदारनाथ पुरातील मृत घोषित झालेला शिवम पुण्यात सापडला; प्रादेशिक मनोरुग्णालयात कौटुंबिक पुनर्वसन

पुणे, ८ डिसेंबर २०२५: एखाद्या चित्रपटातील कथेसारखा प्रकार प्रत्यक्षात घडला आहे. २०१५ मध्ये केदारनाथ येथे आलेल्या पुरात मृत घोषित झालेला आणि नंतर गायब झालेला शिवम काही वर्षांनंतर पुण्यात आढळून आला आहे. त्याचे कौटुंबिक पुनर्वसन पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात करण्यात आले आहे.

सदर रुग्णावर मनोरुग्णालयात दोन वर्षे उपचार झाले. याआधी शिवम एका चोरीच्या घटनेत आरोपी म्हणून न्यायालयात हजर झाला असता. न्यायालयात त्याला मानसिक आजार असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्याला प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचे कौटुंबिक पुनर्वसन करण्यात आले.

येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. श्रीनिवास कोलोड यांनी सांगितले की, शिवम प्रथमच बंदी मनोरुग्ण म्हणून २७ ऑक्टोबर २०२१ रोजी दाखल झाला होता. त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम २९५ अंतर्गत गुन्हा नोंद होता. मनोरुग्णालयाच्या समाज सेवा अधिक्षक रोहिणी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णाच्या नातेवाईकांचा शोध लागला आणि त्याला पुन्हा कुटुंबासोबत जोडले गेले.

रोहिणी भोसले यांनी गूगल सर्च व पोलीस, न्यायालयाच्या माध्यमातून शिवमच्या गावातील पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. काही दिवसांत रुग्णाचे नातेवाईक शोधून त्याच्याशी संपर्क साधला गेला. शिवमचा रोजचा दिनक्रम आणि केदारनाथ येथील मंदिरातील सेवा यावरून त्याचे स्थान निश्चित झाले.

रुग्णालयाच्या टीमने वैद्यकीय, कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रियेत सतत सहकार्य केले. डॉ. शमा राठोड, डॉ. वर्षा बेडगकर, डॉ. इंगले, डॉ. अमित गोसावी, तसेच वार्डच्या कविता गाड़े आणि संपूर्ण रुग्णालयाने शिवमच्या पुनर्वसनात योगदान दिले.

शिवमच्या पुनर्वसनानंतर त्याला नातेवाईकांच्या ताब्यात दिले गेले असून हा प्रकरण समाजसेवा, न्यायालयीन सहकार्य आणि रुग्णालयाच्या टीमच्या सहकार्याने यशस्वी झाले. या घटनेमुळे मनोरुग्णालयाच्या कौटुंबिक पुनर्वसन प्रक्रियेची महत्त्वपूर्ण उदाहरणे समोर आली आहेत.