September 17, 2024

पुणे: मुलाकडून आईचा गळा दाबून खून, अभ्यास करताना मोबाइल पाहिल्याने आई रागविल्याचे कारण

पुणे, १७/०२/२०२३: अभ्यास करताना मोबाइल पहात असलेल्या मुलाला रागविल्याने बारावीतील मुलाने आईचा गळा दाबून तिचा खून केल्याचां धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
लोणीकाळभोर पोलिसांनी जिशन जमीर शेख (वय १८, रा. उरुळीकांचन) या  मुलाला अटक केली आहे. तस्लीम जमीर शेख (वय ३७, रा. उरुळीकांचन) असे मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक अमोल लक्ष्मणराव घोडके यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना उरुळी कांचन येथील माऊली कृपा इमारतीत १५ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तस्लीम शेख हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविला. डॉक्टरांना संशय आल्याने तेथे तीन डॉक्टरांच्या देखरेखीखाली शवविच्छेदन करण्यात आले. त्यात गळा दाबून आणि डोक्याला जखम झाल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल डॉक्टरांनी दिला.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी सांगितले की, डॉक्टरांच्या अहवालानंतर पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा नेमकी कोणी माहिती देण्यास तयार नव्हते. त्यामुळे सुरुवातील पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला़. ही घटना घडली, तेव्हा वडील जमीर आणि मुलगा जिशान हे दोघेच तेथे होते. त्यांच्याकडे स्वतंत्र चौकशी केल्यावर मुलाने घडलेली घटना सांगितली.
जमीर शेख हे नमाज पठणासाठी गेले होते. त्यांची धाकटी मुलगी बाहेर गेली होती. मुलगा जिशान हा बारावीला आहे. तो अभ्यास करीत असताना मोबाइल पहात बसला होता. ते पाहून त्याची आई तस्लीम चिडली. ती जिशानला रागविली. त्याच्या गालावर चापट मारली. त्यामुळे जिशान याने आईला जोरात भिंतीवर ढकलले आणि तिचा गळा दाबला. त्यात तिचा मृत्यू झाला. आई निपचित पडल्याचे पाहून जिशान घाबरला. त्याने ब्लेडने तिचे मनगट कापले. मात्र मृत्यू झाला असल्याने  रक्त आले नाही. त्याने वायर पंख्याला अडकविली. फरशीवर आईचा मृतदेह ठेवला. काही वेळाने जमीर शेख आल्यावर आईने गळफास घेतला. मी तिला खाली उतरुन ठेवल्याचे सांगितले. त्यांनी तस्लीम यांना रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी ससून रुग्णालयात नेण्यास सांगितले. शवविच्छेदनात खुनाचा प्रकार समोर आला.
याबाबत घरातील कोणीही फिर्याद देण्यास तयार नसल्याने पोलिसांच्या वतीने फिर्याद देण्यात आली असून मुलाला अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक काळे तपास करीत आहेत़.