December 13, 2024

पुणे: कर्तव्यात कसूर केल्याने तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे पुण्यात निलंबन

पुणे, २९/०६/२०२३: पुण्यातील मध्यवस्तीतील सदाशिव पेठेत एका तरुणीवर भर दिवसा तरुणांनी कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे.याप्रकरणात दोन तरुणांनी धाडसाने हल्लेखोरास पकडून जवळच्या पेरुगेट पोलीस चौकीत आणले. मात्र, पोलीस चौकीत पोलीसच नसल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे आताविश्रामबाग पोलिस ठाणे अंतर्गत पेरूगेट चौकीतील पोलिस हवालदारासह तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी दिली आहे.

पोलिस हवालदार सुनील शांताराम ताठे, पोलिस कर्मचारी प्रशांत प्रकाश जगदाळे आणि सागर नामदेव राणे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहे.

पुण्यातील सदाशिव पेठेत दोन दिवसांपूर्वी महाविद्यालयात जात असलेल्या मुलीच्या मागे धावत एका तरुणाने त्या तरुणीवर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेच्या वेळेस दोन तरुणांनी जीवाची पर्वा न करता त्या कोयताधारी हल्ला करणाऱ्या तरुणाला पकडले होते. त्यावेळी जवळच असलेल्या पेरुगेट पोलीस स्टेशनमध्ये एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता हे दिसून आले. स्थानिकांनी फोन केल्यावर घटनास्थळी पोलिस उशिराने दाखल झाले. या घटनेने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. आता याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाणे अंतर्गत पेरूगेट चौकीतील पोलिस हवालदारासह तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.तसेच सदर भागात गस्त वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.