पुणे, २३ जानेवारी २०२६: लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांचे कारण देत वर्षानुवर्षे रखडवली जाणारी महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाची परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलून प्रशासनाने उमेदवारांच्या संयमाची परीक्षा पाहिली आहे. रविवारी (ता. २५) होणार असल्याचे जाहीर करूनही ऐनवेळी परीक्षा रद्द केल्याने महापालिकेच्या नियोजनशून्य आणि बेफिकीर कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.
११३ पदांच्या भरतीसाठी २०२४ पासून सुरू असलेली प्रक्रिया आचारसंहिता, आरक्षण, मंजुरी, आयबीपीएस करार संपुष्टात येणे अशा कारणांनी सातत्याने अडवली गेली. अखेर सर्व अडथळे दूर झाल्याचा दावा करत परीक्षा जाहीर करण्यात आली होती. तब्बल ४१ हजार उमेदवारांना परीक्षा केंद्र, वेळापत्रकाची माहिती देण्यात आली होती आणि राज्यातील २० जिल्ह्यांत परीक्षा होणार होती.
मात्र परीक्षा खासगी केंद्रांवर घेतली जात असल्याचा मुद्दा ऐनवेळी पुढे आला. यावरून दोन दिवस महापालिका भवनासमोर आंदोलन झाले. उमेदवार रस्त्यावर उतरले, पण प्रशासन वेळेत निर्णय घेण्यात अपयशी ठरले. परिणामी, कोणतीही ठोस तयारी नसल्याचे उघड होत परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्याची नामुष्की महापालिकेवर आली.
वारंवार परीक्षा जाहीर करणे आणि नंतर रद्द करणे, हा प्रकार उमेदवारांच्या भवितव्याशी खेळणारा असून महापालिका प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचे जिवंत उदाहरण असल्याची तीव्र टीका उमेदवारांकडून होत आहे.

More Stories
Pune: विमानतळापर्यंत थेट मेट्रोची कनेक्टिव्हिटी – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Pune: मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन सूचना
तिकीट स्कॅन केल्यावरच उघडणार मेट्रो स्थानकावरील AFC गेट्स; पुणे मेट्रोचा महत्त्वाचा निर्णय