September 14, 2024

पुणे: जी-२० डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगटाची तिसरी बैठक, भारताच्या डिजिटल सामर्थ्याचे दर्शन घडविणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन

पुणे, दि. १२/०६/२०२३: जी-२० डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगट बैठकीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल जे डब्ल्यू मेरिएट येथे केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत आयोजित प्रदर्शनाने उद्घाटन केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या हस्ते आणि परदेशी प्रतिनिधींच्या उपस्थितीत झाले.

यावेळी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव अल्केश कुमार शर्मा, पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, मनपा आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर आणि उपस्थित प्रतिनिधींनी प्रदर्शनाला भेट देऊन विविध दालनांची माहिती घेतली. भारतातील डिजीटल प्रगतीसंदर्भात सदस्यांनी माहिती घेतली आणि विविध नाविन्यपूर्ण उपक्रमात विशेष रुची दाखवली.

प्रदर्शनातून भारताच्या डिजिटल सामर्थ्याचे दर्शन
भारताच्या डिजिटल सामर्थ्याचे दर्शन घडविणारे हे प्रदर्शन पाहून बैठकीसाठी उपस्थित परदेशी प्रतिनिधी प्रभावित झाले. या प्रदर्शनात आधार, युपीआय प्रणाली, डिजीलॉकर, उमंग उपयोजक, शैक्षणिक उपयोगी दीक्षा उपयोजक व संकेतस्थळ, भाषिनी उपयोजक व संकेतस्थळ, ई-संजीवनी राष्ट्रीय टेलीमेडीसीन प्रणाली, सहकारी कृषी पणन बाजारपेठ जोडणीचा ई-नाम प्रकल्प आणि सॉईल हेल्थ कार्ड, ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी), डीजीट प्लॅटफॉर्म बाबत माहितीपूर्ण दालनांतून या प्रकल्पांची माहिती प्रतिनिधींनी उत्सुकतेने घेतली. यामध्ये डिजिटल इंडिया जर्नी हा सिम्युलेटरद्वारे भारतातील माहिती तंत्रज्ञानाच्या वापराविषयी अनुभव दर्शविणारे साधनही आकर्षण ठरले आहे.

‘आधार’बाबत जाणून घेतले
भारत सरकारने राबविलेल्या आधार ओळख प्रणालीच्या उपक्रमाची माहिती सर्वांनी बारकाईने जाणून घेतली. जगातील हा एक मोठा आणि यशस्वी उपक्रम असल्याचे सांगण्यात आले. आधार ओळख प्रणालीच्या सहाय्याने जगातील सर्वाधिक बँक खाती भारतात काढण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आधार क्रमांकाचा, ई- केवायसी चा उपयोग करुन थेट लाभ हस्तांतरण, अर्थसहाय्याचे थेट बॅंक खात्यात हस्तांतरण तसेच अनेक ई सुविधांशी आधारची जोडणी याबाबत यावेळी सादरीकरणाद्वारे माहिती सांगण्यात आली.

पुणे शहराची डिजिटल क्षेत्रातील प्रगती प्रदर्शित
पुणे महानगरपालिका व पुणे स्मार्ट सिटी, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानेही आपल्या प्रकल्पांचे आणि त्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराविषयी डिजिटल सादरीकरण स्क्रीनद्वारे तसेच चित्रफीतीद्वारे केले आहे. पुणे महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या दालनातून पुणे शहरात राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांची माहिती दर्शविण्यात आली आहे. अत्याधुनिक स्काडा यंत्रणेचा उपयोग केलेल्या एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रणाली, एंटरप्राईज जीआयएस प्रणाली, पुणे मनपाचे संकेतस्थळ व नागरिक सहभागाचे विविध डिजिटल उपक्रम, बहुविध उपयोगाचे चॅटबोट यांचे सादरीकरण यातून करण्यात आले असून मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाविषयी चित्रफीतीद्वारे माहिती देण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवड महानरगपालिकेने आपल्या दालनातून शहरातमध्ये १२३ शाळांत राबविलेल्या ई-क्लासरुम प्रकल्प, जीआयएस आधारित मालमत्ता मॅपींग प्रकल्प, शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा, स्मार्ट घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, स्मार्ट पाणी व्यवस्थापन, नागरिकांना सूचना देण्यासाठी डिजिटल बोर्ड उभारणीचा प्रकल्प आदी प्रकल्पांची माहिती सादर केली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उद्योगांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधांचे सादरीकरण केले.