February 28, 2024

पुणेरी पलटण संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश

कोलकत्ता, 11 फेब्रुवारी 2024: दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत चतुरस्त्र दर्शन घडविणाऱ्या पुणेरी पलटण संघाने तमिळ थलायवाज संघाचा 56-29 असा धुव्वा उडवताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. 

कोलकत्ता येथे झालेल्या या लढतीत अस्लम इनामदार च्या वेगवान चढायामुळे पुणेरी पलटण संघाने तिसऱ्याच मिनिटाला सहा गुणांची आघाडी घेतली. मोहंमद रेजा काबुद्रहांगी याने पंकज मोहितेची सुपर टॅकल करताना तमिळ संघाला पुनरागमन करून दिले. याचवेळी मोहित गोयतची बहुमोल चढाई आणि अबीनेश नडराजन याने विशाल चाहलची केलेली पकड यामुळे तमिळ संघावर पहिला लोन चढवाताना पुणेरी पलटण संघाने नवव्या मिनिटाला 12-2 अशी आघाडी मिळवली. 

मोहितने दहाव्या मिनिटाला अफलातून चढाई करून पुणेरी पलटणची आगेकूच कायम राखली. अजिंक्य पवारने तमिळ संघाकडून जोरदार आक्रमण केले. मात्र त्याला पुणेरी पलटण संघाचा बचाव भेदता आला नाही. पुणेरी पलटण संघाने सलग दुसरा लोन चढवून मध्यंतराला 28-10 अशी निर्णायक आघाडी घेतली. 

उत्तरार्धात मोहित गोयतने अभिषेकची पकड केली. पाठोपाठ अबीनेश याने मोहंमद रेजा याला पेचात पकडताना 27व्या मिनिटाला तमिळ संघाचा केवळ एक खेळाडू मैदानात ठेवला. पाठोपाठ पुणेरी पलटण संघाने सलग तिसरा लोन चढवताना 41-14 अशी आघाडी घेत सामन्याचा निकाल स्पष्ट केला. 

अखेरच्या काही मिनिटात तमिळ संघाने पिछाडी कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र पुणेरी पलटण संघाने आपले वर्चस्व आणि पकड कायम राखताना एकतर्फी विजयासह उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला.