पुणे, ९ मार्च २०२६ः पुणे प्रदूषणमुक्त करण्यासाठी व शहर नागरिकांना राहण्याच्या दृष्टीने ‘इज ऑफ लिव्हिंग’ करण्यासाठी व वाहतुकीचा वेग वाढवण्याच्या दृष्टीने वर्षभरात प्राधान्याने कामे केली जाणार आहेत. यात प्रामुख्याने रस्त्यांचे जाळे विकसित करण्यावर भर राहणार आहे. समाविष्ट गावातील एक प्रमुख रस्ता विकसीत केला जाणार आहे. पाणी पुरवठा कामासाठी सर्वाधिक तरतूद करण्यात आली असून, येत्या वर्षभरात प्राधान्याने पाणी योजना पूर्ण करण्यावर आमचा भर राहणार आहे, अशी माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे महानगरपालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी तब्बल १३ हजार ९९५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सोमवारी स्थायी समितीसमोर सादर केले. यानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी वरील माहिती दिली. आयुक्त राम म्हणाले, शहराच्या पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक आणि कचरा व्यवस्थापन या प्रमुख क्षेत्रांवर भर देणारे हे अंदाजपत्रक असून, विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली आहे. या अंदाजपत्रकात पाणीपुरवठा विभागासाठी सर्वाधिक २ हजार ०७७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहराचा वाढता विस्तार आणि नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये पाणीपुरवठा व्यवस्था मजबूत करण्यासाठी या निधीचा वापर केला जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणानुसार पुण्यात ‘इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स’वर भर दिला जाणार आहे. शहर स्वच्छतेने प्राधान्याने कामे केली जाणार आहे. कचरा व्यवस्थापनासाठी यंत्रणा उभारण्यात आली असून, त्याचे परिणाम येत्या वर्षभरात दिसतील. शहरात रस्त्यांचे जाळे विस्तारले जाणार आहे. खड्डे, ड्रेनेज चेंबर समपातळीत वर्षभरात प्रामुख्याने कमी झाली आहे. हे तिन्ही एकत्रित करण्याठी एसओपी तयार केली आहे. याशिवाय पथ विभागासाठी १ हजार ८६६ कोटी रुपये, घनकचरा व्यवस्थापनासाठी १ हजार ३९० कोटी रुपये, तर मलनिस्सारण प्रकल्पासाठी १ हजार २१६ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन वाहतूक नियोजन व प्रकल्पांसाठी ७४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उड्डाणपूल, रस्ते रुंदीकरण, वाहतूक सुधारणा प्रकल्प आणि सिग्नल व्यवस्थापनासाठी या निधीचा वापर होणार आहे. शिक्षण क्षेत्रालाही या अंदाजपत्रकात मोठे स्थान देण्यात आले असून, प्राथमिक शिक्षण विभागासाठी ९७९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून शहरातील ७५ शाळा आदर्श शाळा तयार करण्यात येणार आहेत. शाळांची दुरुस्ती, डिजिटल शिक्षण साधने, विद्यार्थ्यांसाठी सुविधा आणि शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी देखील कामे केली जाणार आहेत, असे राम म्हणाले.
भूसंपादनासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद
शहरातील प्रमुख समस्या वाहतूक कोंडीची आहे. अनेक रस्ते केवळ भूंसपादनाअभावी रखडलेले आहेत. आयुक्तांनी भूसंपादनाच्या कामासाठी ५०० कोटी रुपयांची भरीव तरतूद केली असून हे पैसे केवळ याच कामासाठी वापरले जाणार आहेत. शहराच्या सुमारे २ हजार ४०० कि.मी. रस्त्यांपैकी केवळ ३२ प्रमुख रस्त्यांवर मोठी वाहतूक आहे. यामुळे वाहतूक कोंडी होते. अनेक रस्ते भूसंपादनाअभावी विकसित करता आलेले नाहीत. आगामी वर्षात मिसिंग लिंकसाठी लागणार्या रस्त्यांसाठी जागा ताब्यात घेण्यात येणार आहेत.
खडकवासला ते पर्वती जलकेंद्रापर्यंतच्या मुख्य लाईनची दुरूस्ती
शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी खडकवासला ते पर्वती जलकेंद्रापर्यंतच्या मुख्य लाईनची दुरूस्ती करण्यात येणार आहे. चोवीस तास योजना लवकरच पूर्णपणे कार्यन्वित करण्यात येईल. जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर बेड्स बदलून गळती कमी करण्यात येईल. शहराच्या स्वच्छतेसाठी अधिकची वाहने आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासोबत ओल्या कचर्यावर प्रक्रिया करण्याचा ३०० मे. टना प्रकल्प सुरू करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे.

More Stories
Pune: बालगंधर्व रंगमंदिराच्या पुर्नविकाचा मुद्दा पुन्हा अजेंड्यावर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल पुणेकरांच्या सेवेत
धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी राघवेंद्र बाप्पु मानकर यांची निवड