May 20, 2024

पुनित बालन ग्रुप आणि माणिकचंद ऑक्सिरिच यांचा एमसीएशी सहकार्य करार

पुणे, दि. २३ ऑक्टोबर  २०२३ – महाराष्ट्रातील  क्रिकेट विकासासाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने (एमसीए) यांनी पुनित बालन ग्रुप आणि माणिकचंद ऑक्सिरिच यांच्याशी पाच वर्षाचा सहकार्य करार केला आहे. एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार आणि पुनित बालन ग्रुपचे चेअरमन व मुख्य व्यवस्थापकीय संचालक पुनीत बालन यांनी आज ही घोषणा केली. 
 
यावेळी महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या नवीन जर्सीचे एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार आणि पुनित बालन ग्रुपचे चेअरमन व मुख्य व्यवस्थापकीय संचालक पुनीत बालन, एमसीएचे सर्व ऍपेक्स कमिटी सदस्य यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या वेळी एमसीएचे सचिव शुभेंद्र भांडाकर, तसेच विनायक द्रविड, सुहास पटवर्धन, राजू काणे, रणजित खिरीड, कमलेश पिसाळ, सुशील शेवाळे, सुनील मुथा, अशोक वझे व कल्पना तापकीर हे कार्यकारिणी सदस्य आणि मुख्य संचालन अधिकारी अजिंक्य जोशी उपस्थित होते.
पीबीजी सध्या विविध क्रीडाप्रकारांमधील ६० खेळाडूंना स्वतंत्रपणे साहाय्य करीत आहोत. या खेळाडूंनी सर्वोच्च स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करावे असे आम्हाला वाटते आणि या प्रक्रियेत आम्ही त्यांना संपूर्ण पाठिंबा देत आहोत. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली काम करीत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेमध्ये आम्हाला हीच गुणवत्ता दिसली.
 
यावेळी एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा करताना सांगितले, की हा करार पाच वर्षांसाठी असून त्यातून संघटनेला पुनित बालन ग्रुप व ऑक्सिरिचकडून दर वर्षी पाच कोटी रुपये मिळणार आहेत.

या करारान्वये महाराष्ट्राच्या रणजी संघासह सर्व वयोगटांमधील पुरुष व महिला संघांमधील खेळाडूंच्या पोशाखावर समोरच्या बाजूला पुनित बालन ग्रुपचा लोगो असेल, तर बाहीवर माणिकचंद ऑक्सिरिचचे बोधचिन्ह राहील. तसेच या सहकार्य करारामुळे महाराष्ट्रातील क्रिकेटसाठी पायाभूत सुविधा, आधुनिक साधनसुविधा व खेळाडूंसाठी नव्या योजनांबरोबरच राज्यातील दुर्गम ठिकाणांमध्येही गुणवत्ता शोध मोहीम राबविणे व युवा खेळाडूंच्या विकासासाठी योजना राबविणे शक्य होईल, असे रोहित पवार यांनी सांगितले.
पुनित बालन ग्रुप आणि माणिकचंद ऑक्सिरिच हे पुण्यातील आघाडीचे व्यवसाय समूह असून क्रीडाक्षेत्रातील त्यांचे कार्य स्पृहणीय आहे. त्यांनी विविध खेळांना, तसेच अनेक खेळाडूंना पाठिंबा देताना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी साहाय्य केले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील क्रिकेटचे उज्वल भवितव्य ध्यानात घेऊन या सहकार्य करारासाठी आम्ही त्यांची निवड केली, असेही पवार यांनी सांगितले.

महाराष्ट्र क्रिकेट संघांच्या नव्या जर्सीच्या अनावरण प्रसंगी पुनित बालन ग्रुपचे चेअरमन व मुख्य व्यवस्थापकीय संचालक पुनित बालन उपस्थित होते.  पुनीत बालन पुढे म्हणाले, की आमच्या क्रीडा विभागातर्फे आम्ही विविध क्रीडाप्रकारांना साहाय्य केले आहे आणि आता महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला प्रायोजित करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही आतापर्यंत ६० खेळाडूंना स्वतंत्रपणे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले आहे. या खेळाडूंनी पुडे जाऊन भारताचे प्रतिनिधीत्व करावे हीच आमची इच्छा आहे. या प्रवासात आम्ही सातत्याने त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू.  अशीच गुणवत्ता आम्ही रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये पाहिली. त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर अशा प्रकारचा करार करण्याची तयारी दर्शविली, असेही बालन म्हणाले.

रोहित पवार यांनी या वेळी एमसीएच्या लातूर व धुळे येथील क्रीडासंकुलांच्या आणि तेथील सुविधांच्या विकसनासाठी विविध उद्योगसंस्थांनी पुढे यावे, असे आवाहन केले. तसेच या संकुलांच्या नामकरणाचे हक्क खरेदी करण्यासाठीही त्यांनी उद्योगसंस्थांना आवाहन केले.