July 27, 2024

श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत रत्नागिरी जेट्स संघाची गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप

पुणे, २२ जुन २०२३: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत दहाव्या दिवशी कुणाल थोरात(२-२३) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर रत्नागिरी जेट्स संघाने पुणेरी बाप्पा संघावर डक वर्थ लुईस नियमानुसार ८ धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे रत्नागिरी जेट्स संघाने ४ विजय, १ पराभव व ८ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहूंजे येथील स्टेडियमवर सुरूअसलेल्या या स्पर्धेत रत्नागिरी जेट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रत्येकी १५ षटकांचा करण्यात आला. सलामीचा फलंदाज पवन शहा १२ धावांवर बाद झाला. त्यानंतर श्रीपाद निंबाळकर व शुभम तैस्वाल यांनी आक्रमक फलंदाजी केली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी १० चेंडूत २५ धावांची भागीदारी केली. श्रीपाद निंबाळकर ३० धावा काढून कुणाल थोरातच्या गोलंदाजीवर झेल बाद झाला. त्याने ३ चौकार व १ षटकार मारला. त्यांनतर शुभम तैस्वालने २४ चेंडूत ३ चौकार व २ षटकारासह ३६ धावांची खेळी करून धावगती वाढवली.
त्यानंतर मात्र, रत्नागिरीच्या गोलंदाजांनी पुणेरी बाप्पाचे मधल्या फळीतील फलंदाज झटपट तंबूत परत पाठवले. रोहन दामले(११धावा), प्रशांत कोरे(१३धावा) हे झटपट बाद झाले. सुरज शिंदेने थोडीशी आक्रमक खेळी करत १५ चेंडूत नाबाद २३धावा काढून संघाला १५ षटकात ६ बाद १२९धावांचे आव्हान उभे करून दिले. त्यात त्याच्या दोन षटकारांचा समावेश होता. रत्नागिरी जेट्सकडून कुणाल थोरात(२-२३), किरण चोरमले(१-११), निकित धुमाळ(१-१५), दिव्यांग हिंगणेकर(१-२५)यांनी सुरेख गोलंदाजी केली.
गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असलेल्या रत्नागिरी जेट्सला विजयासाठी १३० धावांचे आव्हान होते. अझीम काझी(२१धावा) व प्रीतम पाटील या जोडीने २२ धावांची सलामी दिली. अझीम काझीने ३ चौकार व १षटकार खेचले. अझीमला सचिन भोसलेने झेल बाद करून तंबूत परत पाठवले.  धीरज व प्रीतम या जोडीने २६ धावांची खेळी करून धावफलक हलता ठेवला. त्यानंतर सचिन भोसले व पियुष साळवी यांनी अनुक्रमे प्रीतम पाटील(२०धावा) व किरण चोरमले(०धावा) यांना बाद करून सामन्यात रंगत आणली. धीरज फटांगरे नाबाद १८, ऋषिकेश सोनावणे नाबाद ९ धावांवर खेळत असताना पावसामुळे खेळ थांबविण्यात आला. तेव्हा रत्नागिरी संघ ७.४ षटकात ३बाद ७० धावांवर होता. म्हणजेच डक वर्थ लुईस नियमानुसार रत्नागिरी संघाने(७.४ षटकात ६२धावा)आठ धावांनी आघाडीवर होता व याचा त्यांना फायदा झाला. हवामानाचा अंदाज घेत धीरज फटांगरेने १६ चेंडूत २चौकारासह नाबाद १८ धावा, ऋषिकेश सोनावणेने नाबाद ९ धावा काढून केलेली फटकेबाजी संघासाठी निर्णायक ठरली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
पुणेरी बाप्पा: १५ षटकात ६बाद १२९धावा (शुभम तैस्वाल ३६(२४,३x४,२x६), श्रीपाद निंबाळकर ३०(१९,३x४,१x६), सुरज शिंदे नाबाद २३, प्रशांत कोरे १३, पवन शहा १२, कुणाल थोरात २-२३, किरण चोरमले १-११, निकित धुमाळ १-१५, दिव्यांग हिंगणेकर १-२५) पराभुत वि.रत्नागिरी जेट्स: ७.४  षटकात ३बाद ७०धावा (प्रीतम पाटील २०, अझीम काझी २१, धीरज फटांगरे नाबाद १८, ऋषिकेश सोनावणे नाबाद ९, सचिन भोसले २-१७, पियुष साळवी १-७); सामनावीर-कुणाल थोरात; रत्नागिरी जेट्स संघ डक वर्थ लुईस नियमानुसार ८ धावांनी विजयी.