December 13, 2024

श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत रत्नागिरी जेट्सची विजयी मालिका कायम

पुणे, २० जुन २०२३: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सहाव्या दिवशी दुसऱ्या सामन्यात अझीम काझी(५३धावा), दिव्यांग हिंगणेकर(नाबाद ४६धावा), निखिल नाईक(३८धावा) यांनी केलेल्या छोट्या पण महत्वपूर्ण धावांच्या जोरावर रत्नागिरी जेट्स संघाने छत्रपती संभाजी किंग्ज संघाचा १७ धावांनी पराभव करून दुसरा विजय नोंदवला.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहूंजे येथील स्टेडियमवर सुरूअसलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या सामन्यात छत्रपती संभाजी किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. छत्रपती संभाजी किंग्ज संघाच्या रामेश्वर दौड(२-५०), शमसुझमा काझी(१-२३), हितेश वाळुंज(१-२८) यांनी अचूक गोलंदाजी करत रत्नागिरीच्या सलामीच्या फलंदाजांना फारशी फटकेबाजी करू दिली नाही. धीरज फटांगरे(१धाव), प्रीतम पाटील(१४धावा), किरण चोरमले(२धावा) हे तीनही फलंदाज लवकर तंबूत परतल्यामुळे रत्नागिरी संघ ७ षटकात ३ बाद ४१ असा अडचणीत सापडला. त्यानंतर अझीम काझीने ४७चेंडूत ६चौकार व १ षटकार खेचत ५३ धावा, तर निखिल नाईकने २५चेंडूत ३चौकार व २षटकारासह ३८ धावा केल्या. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी ५१ चेंडूत ६९ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला.

हे दोघेही बाद झाल्यावर फलंदाजीस सहाव्या क्रमांकावर आलेल्या दिव्यांग हिंगणेकरने चौफेर फटकेबाजी करत १५ चेंडूत ५चौकार व २ षटकारासह नाबाद ४६ धावा चोपल्या, तर रोहित पाटीलने नाबाद ८ धावा काढून साथ दिली. दिव्यांग व रोहित यांनी पाचव्या गड्यासाठी २३चेंडूत ५८ धावांची महत्वपूर्ण भागीदारी करून संघाला ८बाद १७३ धावांचे आव्हान उभारून दिले.

या आव्हानाचा पाठलाग करताना छत्रपती संभाजी किंग्ज संघाला २० षटकात ८बाद १५६ धावाच करता आल्या. सलामवीर ओंकार खाटपेने एकाबाजूने लढताना ४७ चेंडूत ६चौकार व १ षटकारासह ५३ धावा केल्या. ओंकार व ओम भोसले(धावा) यांनी तिसऱ्या गड्यासाठी ३९ चेंडूत ४६ धावांची भागीदारी केली. त्यानंतर विजय पावलेच्या १०व्या षटकात संभाजी किंग्जच्या अभिषेक पवार(०धाव), रणजीत निकम(५धावा) या दोघांना एका पाठोपाठ बाद करून संभाजी किंग्ज संघाला १०.५ षटकात ५बाद ७७ धावा असे अडचणीत टाकले. विजयासाठी १३ चेंडूत ४६ धावांची आवश्यकता असताना फिरकीपटू कुणाल थोरातने ओंकारला निखिल नाईकने यष्टिचित बाद करून संभाजी किंग्जची समस्या आणखी वाढवली. त्यानंतर संभाजी किंग्जसाठी विजयाचे समीरकरण फारच अवघड होते गेले व रत्नागिरी जेट्स संघाने छत्रपती संभाजी किंग्ज संघावर १७ धावांनी विजय मिळवला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:
रत्नागिरी जेट्स: २० षटकात ५ बाद १७३धावा(अझीम काझी ५३(४७,६x४,१x६), दिव्यांग हिंगणेकर नाबाद ४६(१५,५x४,२x६), निखिल नाईक ३८(२५), रामेश्वर दौड २-५०, शमसुझमा काझी १-२३, हितेश वाळुंज १-२८) वि.वि.छत्रपती संभाजी किंग्ज: २० षटकात ८बाद १५६धावा(ओंकार खाटपे ५३(४७,६x४,१x६), शमसुझमा काझी नाबाद २७, राजवर्धन हंगर्गेकर २१, ओम भोसले २०, मुर्तझा ट्रंकवाला १३, प्रदीप दाढे ३-१८, विजय पावले २-३४, दिव्यांग हिंगणेकर १-३०); सामनावीर-दिव्यांग हिंगणेकर; रत्नागिरी जेट्स संघ १७ धावांनी विजयी.