पुणे, ९ आॅक्टोबर २०२५ : कुख्यात गुंड निलेश घायवळला पासपोर्ट मिळाल्याच्या प्रकरणावरून शिवसेनेचे महानगर प्रमुख आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. घायवळला परदेशात पळून जाण्यासाठी पाटील यांचे कार्यकर्ते समीर पाटील यांनी मदत केली, तसेच कोथरूड परिसरातील गुन्हेगारांना अभय दिले, असा आरोप धंगेकरांनी केला होता. या प्रकरणामुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच आता धंगेकर स्वतःच नव्या अडचणीत सापडले आहेत.
रवींद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर हा सध्या प्रभाग क्रमांक 24 मधील कसबा पेठ रस्ता पेठ मंगळवार पेठ येथून महापालिकेची निवडणूक लढवण्याच्या तयारीमध्ये आहे असे असताना त्याचा कुख्यात गुंड गजानन (गजा) मारणे याच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो समोर आल्यानंतर भाजपकडून धंगेकरांवर जोरदार पलटवार करण्यात आला आहे. भाजपचे प्रसिद्धी प्रमुख पुष्कर तुळजापूरकर यांनी टीका करत म्हटले आहे की, “जिनके घर शिशे के होते हैं, वो दूसरों के घर पे पत्थर नहीं मारते.” आपल्या घरातील अंधार आधी पाहावा, असा टोला त्यांनी लगावला. “फोटोमध्ये त्यांचे चिरंजीव कुख्यात गुंड गजानन मारणे याच्यासोबत काय करत आहेत, याचे स्पष्टीकरण धंगेकरांनी द्यावे,” अशी मागणी भाजपने केली आहे.
दरम्यान, निलेश घायवळविरोधात बनावट पासपोर्ट, फसवणूक आणि इतर गंभीर गुन्ह्यांखाली अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. कोथरूड पोलिसांनी दाखल केलेल्या प्रकरणात घायवळने नावातील बदल करून ‘तत्काळ पासपोर्ट’ मिळवला आणि त्याच्या मदतीने परदेशात पळ काढल्याचे उघड झाले आहे. न्यायालयाने त्याचा पासपोर्ट जमा करण्याचा आदेश दिला होता, मात्र तो अंमलात आणला गेला नाही. पोलिसांनी अलीकडेच त्याच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकून दहा तोळे सोनं व दस्तऐवज जप्त केले असून, लूक आऊट नोटीसही जारी केली आहे.
या सर्व घडामोडींमुळे धंगेकरांच्या आरोपांचा उलटाच फटका त्यांनाच बसलेला दिसत आहे. एका बाजूला त्यांनी भाजप नेत्यांवर गुन्हेगारांशी संबंध असल्याचे आरोप केले असताना, दुसरीकडे त्यांच्या मुलाचा गुंडाबरोबरचा फोटो समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, दोन्ही पक्षांमध्ये आरोप–प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे
More Stories
Pune: अनधिकृत फ्लेक्सचा दंड नसल्यास उमेदवारी अर्ज बाद; उमेदवारांना घ्यावी लागणार एनओसी
पुणे: पालिकेचा दिवाळी बचत बाजार गजबजला – दोन दिवसांत १९ लाखांची विक्री
Pune: नागरिकांच्या समस्या निराकरणासाठी पीएमआरडीएची तालुकानिहाय ९ क्षेत्रीय कार्यालये सुरु