October 14, 2025

माजी आमदार रवींद्र धंगेकरांवर समीर पाटीलने दाखल केला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

पुणे, १४ ऑक्टोबर २०२५: कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर हे मंत्री चंद्रकांत पाटील आणि त्यांचा खासम खास समीर पाटीलवर सातत्याने आरोप करत आहेत. या आरोपांवर प्रत्युत्तर म्हणून समीर पाटीलने धंगेकर यांच्याविरोधात तब्बल ५० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत समीर पाटील यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली.

ते म्हणाले, “रवींद्र धंगेकर गेल्या आठ दिवसांपासून कोणतेही ठोस पुरावे न देता माझ्यावर खोटे आरोप करत आहेत. मला ‘मकोका’ सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी ठरवले जात आहे. मात्र, माझ्याविरोधात कोणतेही पुरावे नाहीत. तसेच पोलिसांवरही खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप माझ्या नावाने लावला गेला आहे, जो पूर्णपणे निराधार आहे.”

पुढे बोलताना पाटील म्हणाले, “सागर सुभाष गवसणे नावाच्या व्यक्तीला मी ओळखत नाही. तो उस्मानाबाद, बीड, जामखेड येथे गुन्ह्यांमध्ये सामील असल्याची माहिती आहे. तसेच कोथरूड पोलिस ठाण्याच्या हद्दीत १३ तारखेला कोणताही गोळीबार झालेला नाही. मी कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याला फोन केला नाही. त्यामुळे धंगेकर यांचे सर्व दावे खोटे आहेत.”

“माझ्यावर केलेल्या आरोपांचे दोन दिवसांत पुरावे सादर करा, अन्यथा मी न्यायालयात पुढील कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करेन,” असा इशाराही समीर पाटील यांनी दिला.