पुणे १४ जून, २०२४ : पुण्यातील सुहाना बसंत फाउंडेशन आणि कन्नड संघ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवार दि २२ जून व रविवार दि २३ जून रोजी ६ व्या सतार नवाज उस्ताद बाले खान संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर महोत्सव एरंडवणे येथील डॉ कलमाडी श्यामराव हायस्कूलच्या शकुंतला शेट्टी सभागृहात दोन्ही दिवशी सायं ४.३० पासून संपन्न होईल. महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्यासाठी प्रवेश देण्यात येईल.
सतार नवाज उस्ताद बाले खान यांचे घराणे ‘सताररत्न’ या पदवीने ओळखले जाते. सतार हे वाद्य दक्षिण भारतात रुजविण्यात या घराण्याचा मोठा वाटा असून सतार नवाज उस्ताद बाले खान यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे सुपुत्र आणि प्रसिद्ध सतारवादक रईस खान दरवर्षी पुण्यात या महोत्सवाचे आयोजन करतात. सदर महोत्सवाचे हे सहावे वर्ष असून यावर्षी महोत्सवात सतार निर्माते हाजी अहमद सो आबासो आणि ज्येष्ठ तालवाद्य कलाकार माऊली टाकळकर यांचा विशेष सन्मान होणार आहे अशी माहिती रईस खान यांनी दिली.
मिरजच्या राजघराण्याच्या गायत्रीदेवी पटवर्धन, कन्नड संघाचे अध्यक्ष कुशल हेगडे, उपाध्यक्ष इंदिरा सालीयान, सचिव मालती कलमाडी आदी मान्यवर या वेळी उपस्थित असणार आहेत.
शनिवार दि २२ जून रोजी सायं ४.३० वाजता सहा उस्ताद खान बंधूंच्या ‘सतार षष्टक‘ या सादरीकरणाने महोत्सवाला सुरुवात होईल. यावेळी उस्ताद छोटे रहिमत खान, रफिक, शफिक, रईस, हाफिज आणि मोहसीन हे खान बंधू प्रस्तुतीकरण करतील. पं. राजेंद्र नाकोड हे तबलासाथ करतील. यानंतर मान्यवरांच्या हस्ते सतार निर्माते हाजी अहमद सो आबासो आणि ज्येष्ठ तालवाद्य कलाकार माऊली टाकळकर यांचा विशेष सन्मान होईल. पहिल्या दिवसाच्या उत्तरार्धात ज्येष्ठ गायक पद्मश्री पं. व्यंकटेश कुमार यांचे गायन रंगेल. यावेळी भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी) हे साथसंगत करतील.
रविवार दि २३ जून रोजी सायं ४.३० वाजता महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात ही विदुषी संगीता कट्टी – कुलकर्णी यांच्या गायनाने होईल. कर्नाटक राज्याच्या राज्योत्सव पुरस्काराने सन्मानित संगीता कट्टी या मूळच्या कर्नाटक मधील धारवाड येथील असून त्या पार्श्वगायिका, संगीतकार म्हणून प्रसिद्ध आहेत. यावेळी भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी) हे साथसंगत करतील.
यानंतर ख्यातनाम व्हायोलिनवादक पं. प्रविण शेवलीकर व चैताली शेवलीकर यांचे व्हायोलिनवादन संपन्न होईल. गायकी अंगाने होणाऱ्या व्हायोलिनवादनाची अनुभूती यावेळी रसिकांना घेता येईल. यावेळी पं. राजेंद्र नाकोड हे तबलासाथ करतील. महोत्सवाचा समारोप पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य व सुपुत्र पं. शौनक अभिषेकी यांच्या गायनाने होईल. यासाठी भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी) हे साथसंगत करतील. आनंद देशमुख हे या दोन दिवसीय महोत्सवाचे सूत्रसंचालन करतील.
More Stories
माजी आमदार रवींद्र धंगेकरांवर समीर पाटीलने दाखल केला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
“बोट घातलं तर हात घालू, ॲक्शनला रिऍकशन मिळणार!” – अमित ठाकरे यांचा अभाविपला इशारा
Pune: अनधिकृत फ्लेक्सचा दंड नसल्यास उमेदवारी अर्ज बाद; उमेदवारांना घ्यावी लागणार एनओसी