पुणे, 12 जून 2024 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने २९ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन केले असून सर्वोच्च न्यायालयात प्रकरणे प्रलंबित असलेल्या जिल्ह्यातील पक्षकार किंवा त्यांच्या वकिलांनी त्यांचे संमती अर्ज संपर्क क्रमांक आणि ई-मेल पत्त्यांसह जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या ई-मेल पत्ता pune-disa.mh@bhc.gov.in वर किंवा प्रत्यक्षरित्या सादर करावेत, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन यांनी केले आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने पुणे जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणापैकी काही प्रलंबित प्रकरणांची यादी जिल्हा न्यायालयाच्या https://pune.dcourts.gov.in/ या संकेतस्थळावर प्रकाशित केली आहे. प्रलंबित प्रकरणे सदर विशेष लोकअदालतीमध्ये निकाली काढण्यात येणार आहेत. विशेष लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या प्रकरणांबाबतच्या नोटीसा संबंधित पक्षकारांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत बजावण्यात आल्या आहेत. विशेष लोकन्यायालयापूर्वी त्यांच्या तडजोडीच्या चर्चेची तारीख पक्षकार आणि वकिलांना दिली जाईल.
पक्षकार प्रत्यक्षपणे किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे देण्यात येणाऱ्या लिंकवर दूरदृष्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्स) उपस्थित राहू शकतात, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी कळविले आहे.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही