पुणे, ११/०४/२०२३: समता फिल्म्स प्रस्तुत महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित “सत्यशोधक” या आगामी चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री मा. सुधीरजी मुनगंटीवार यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे करण्यात आले. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भीमराव पट्टेबहादूर, विशाल वाहूरवाघ, लेखक आणि दिग्दर्शक निलेश जळमकर यांच्यासह चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते.
सुधीरजी मुनगंटीवार याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले “सत्यशोधक या चित्रपटाचे मोशन पोस्टर अनावरण करताना मला अतिशय आनंद होतो आहे. २१व्या शतकात समाजातील आपण सर्वजण एकमेकांपासून हळूहळू दूर जात आहोत व अशा काळात सत्यशोधक हा चित्रपट समाजाला दिशा देणारा असेल. क्रांतिसूर्य जोतिबा फुले यांचा “सब समाज को साथ लिए हम, हम को है आगे बढना” हा विचार आणि त्यांच्याबरोबर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाडा येथे महिलांसाठी सुरु केलेली शाळा हा प्रवास दाखविणाऱ्या “सत्यशोधक” या चित्रपटाच्या माध्यमातून अनेकांना प्रेरणा प्राप्त होईल. चित्रपट निर्मितीतून समाज परिवर्तनाची मशाल पेटवायची हे कार्य या चित्रपटाच्या माध्यमातून करणाऱ्या निर्मात्यांचे व कलाकारांचे मी मनापासून अभिनंदन करतो.”
“सत्यशोधक” या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये तत्कालीन व्यवस्थेचे आणि स्त्रियांवरील अत्याचाराचे दाहक सत्य दाखविले आहे, तसेच या कलाकृतीतून महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजासाठी केलेला संघर्ष मांडला आहे. बहुआयामी कलाकार संदीप कुलकर्णी “सत्यशोधक” मध्ये महात्मा फुले यांची भूमिका साकारणार असून राजश्री देशपांडे, रवींद्र मंकणी, गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, सिद्धेश्वर झाडबुके, अनिकेत केळकर, अनिरुद्ध बनकर, राहुल तायडे, मोनिका, जयश्री गायकवाड, डॉ. खेडेकर, डॉ. सुनील गजरे या कलाकारांची साथ त्यांना लाभणार आहे.
समता फिल्म्स प्रस्तुत आणि निलेश जळमकर लिखित व दिग्दर्शित “सत्यशोधक” या चित्रपटाची निर्मिती प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भीमराव पट्टेबहादूर, विशाल वाहूरवाघ यांनी केली असून सहनिर्माते प्रतिका बनसोडे, हर्षा तायडे, राहुल वानखेडे आणि प्रमोद काळे आहेत. किशोर बळी आणि डॉ. चंदू पाखरे यांच्या गीतांना अमित राज यांनी संगीतबद्ध केले असून स्वतः अमित राज, वैशाली सामंत आणि विवेक नाईक यांनी स्वरसाज चढवला आहे तर छायांकन अरुण प्रसाद यांचे आहे. “सत्यशोधक” हा चित्रपट 2023 मध्ये लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.
More Stories
५५० कातकरी आदिवासींना जात प्रमाणपत्राचे वाटप, ५५ कुटुंबांना मिळणार हक्काचे पक्के घर
पुणे: पर्वतीत भाजपाची वाढली धाकधूक! मिसाळ विरोधक भिमालेंनी महापालिकेत केला अर्ज
तुम्ही यांना विधानसभेत पाठवा; पक्ष करताच पवारांकडून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी जाहीर