April 24, 2024

तालवाद्यांच्या त्रिवेणी सादरीकरणाने १० व्या गानसरस्वती महोत्सवाला सुरुवात

पुणे, दि. २३ फेब्रुवारी, २०२४ : कर्नाटकी गिटार, व्हायोलिन आणि तबला या तालवाद्यांच्या त्रिवेणी आविष्काराने १० व्या गानसरस्वती महोत्सवाची आज बहारदार सुरुवात झाली. गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. ज्येष्ठ रंगकर्मी नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्या प्रयत्नांतून स्थापन झालेल्या नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने हा महोत्सव आयोजित करण्यात येतो.

राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे आजपासून सुरु झालेल्या या महोत्सवाला नाट्यसंपदा प्रतिष्ठानचे विश्वस्त व सुप्रसिद्ध गायक पं रघुनंदन पणशीकर, अपर्णा पणशीकर, गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे सुपुत्र बिभास आमोणकर, अजित बेलवलकर आणि समीर बेलवलकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

महोत्सवात आश्वासक युवा कलाकारांकरिता संस्थापित केलेला आणि बेलवलकर ग्रुप प्रस्तुत असलेला गानसरस्वती किशोरी आमोणकर युवा पुरस्कार अभय नायमपल्ली, मानस कुमार आणि ईशान घोष यांना अजित बेलवलकर आणि समीर बेलवलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख रुपये १५ हजार व मानचिन्ह असे याचे स्वरूप होते.

महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात आज अभय नायमपल्ली यांचे कर्नाटकी गिटारवादन, मानस कुमार यांचे व्हायोलिनवादन आणि ईशान घोष यांचे तबलावादन याने झाली. या तीनही युवा आणि आश्वासक कलाकारांनी आपल्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकत आपला वेगळा ठसा उमटविला.

यावेळी त्यांनी राग हंसध्वनी मध्ये आदी तालात गणपती क्रीतीने वादनाला सुरुवात केली. यानंतर मानस कुमार यांनी राग पटमंजिरी मध्ये गत प्रस्तुत केली. तिघांनी यानंतर राग पन्तुवराळी सादर केला आणि कर्नाटक शैलीतील काही रागांचे सादरीकरण केले.

यानंतर पतियाला घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका विदुषी कौशिकी चक्रबर्ती यांचे गायन संपन्न झाले. त्यांनी यावेळी राग शुद्ध कल्याण छेडला. यानंतर त्यांनी गानसरस्वती किशोरी आमोणकर यांना समर्पित ‘आज की घडी शुभ…’ ही बंदिश प्रस्तुत केली. त्यांनी सादर केलेल्या द्रुत तालात ‘ना करो गुमान सुखसंपत पर…’ ही रचनेला उपस्थितांनी दाद दिली.

कौशिकी चक्रबर्ती ओजस अढिया (तबला), तन्मय देवचके (संवादिनी), उस्ताद मुराद खान (सारंगी), मेघोदीपा गंगोपाध्याय व मिताली लोहार (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

यावेळी बोलताना कौशिकी चक्रबर्ती म्हणाल्या, “आम्ही कायमच गानसरस्वती किशोरी आमोणकर यांकडून स्फूर्ती घेत आलो आहोत. त्यांचे उदाहरण आमच्यासमोर सूर्यासमान आहे. त्यांनी खऱ्या अर्थाने आम्हाला प्रकाश दिला आणि मार्ग दाखविला आहे. आजही त्यांचे गाणे ऐकल्यावर खूप बाबी शिकायला मिळतात आणि नव्याने उमजतात. ही गोष्ट माझ्यासारख्या लहान शिष्यासाठी महत्त्वाची आहे.” आज त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ होत असलेल्या या महोत्सवात गायन सादर करायची संधी माझ्यासाठी सन्मानाची बाब असल्याचेही कौशिकी यांनी सांगितले.

विघ्नेश जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.