पुणे, दि.८/०३/२०२३ – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठाशी हातमिळवणी करत चार वर्षाचा बी.एसस्सी ब्लेंडेड अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २०१८ वर्षांपासून मेलबर्न विद्यापीठासोबत करार करत तीन वर्षाचा बी.एसस्सी ब्लेंडेड अभ्यासक्रम सुरू होता, मात्र नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता तो चार वर्षाचा करण्यात आला असून चार पैकी दोन वर्ष विद्यार्थ्यांना मेलबर्न विद्यापीठात पदवी पूर्ण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
या चार वर्षीय बी.एसस्सी ब्लेंडेड पदवी अभ्यासक्रमाची घोषणा ९ मार्च २०२३ रोजी मुंबई येथे ऑस्ट्रेलियन ट्रेड अँड टुरिझम मंत्री डॉन फरेल यांच्या उपस्थितीत करण्यात आली. मेलबर्न विद्यापीठाने भारतातील तीन विद्यापीठांमध्ये हा अभ्यासक्रम या वर्षीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये मद्रास विद्यापीठ, गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट तर महाराष्ट्रातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा समावेश आहे. या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, विद्यापीठाच्या ‘इंटरडीसिप्लिनरी स्कूल ऑफ सायन्सेस’ प्रमुख डॉ. अविनाश कुंभार तसेच मेलबर्न विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डंकन मास्केल, मद्रास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एस. गोवरी, तर गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट प्रा.दयानंद सिद्दावतम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मेलबर्न विद्यापीठाचे कुलगुरू डंकन मास्केल म्हणाले, भारतीय विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा मार्ग खुला करून देण्याच्या दृष्टीने आम्ही या शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देत आहोत. भारतातील प्रतिष्ठित विद्यापीठांसोबत एकत्र काम करताना आम्हाला आनंद होत आहे.
दरम्यान विद्यार्थी सध्या रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, पर्यावरणशास्त्र, भूशास्त्र या विषयात तीन वर्षाची पदवी घेता येते. पुढील काळात याच विषयात चार वर्षाची पदवी घेता येईल. याबाबतची अधिक माहिती लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल असे डॉ.अविनाश कुंभार यांनी सांगितले.
विद्यापीठाने सुरू केलेला हा चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून सुरू करण्यात येत आहे. यामुळे मेलबर्नसारख्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठातही विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर पदवी तसेच संशोधन करण्याची संधी मिळणार आहे. व्हिसा योजनेअंतर्गत ऑस्ट्रेलियामध्ये रोजगाराच्या संधीही मिळू शकतील. तसेच भारतातील प्राध्यापकांना या विद्यापीठासोबत संशोधन आणि तंत्रज्ञान आदींचे आदानप्रदान करणे शक्य होईल.
– डॉ.कारभारी काळे, कुलगुरू
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

More Stories
Pune: पीएमपीएमएल कडून बसस्थानकांचे विद्रुपीकरण करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई
पुणे महापालिकेचे आरक्षण जाहीर अनेक प्रभाग उडाले तर महिला सुरक्षित
Pune: आरपीआयच्या पुणे शहर महिला अध्यक्षपदी हिमाली कांबळे यांची निवड