January 3, 2026

माघारीनंतरही रण तापले; पुण्यात १,१६५ उमेदवार रिंगणात

पुणे, 2 जानेवारी 2026 – पुणे महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवारी माघारीनंतरही शहरातील राजकीय वातावरण तापलेलेच आहे. गेल्या दोन दिवसांत तब्बल ९६९ उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले असले, तरीही अंतिम टप्प्यात १,१६५ वैध उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत. माघारीपूर्वी शहरातील ४१ प्रभागांमध्ये एकूण २,१३४ वैध उमेदवार होते.

तब्बल तीन वर्षांनंतर होत असलेल्या या महापालिका निवडणुकीसाठी यंदा सर्वच राजकीय पक्षांनी वेगळी रणनीती अवलंबली. अधिकृत उमेदवारी जाहीर न करता थेट इच्छुकांना एबी फॉर्म देण्यात आले, त्यामुळे अनेक इच्छुकांनी एबी फॉर्म मिळण्याआधीच उमेदवारी अर्ज दाखल केले. याशिवाय, उमेदवारी न मिळाल्याच्या नाराजीपोटी अनेकांनी पक्षाविरोधात भूमिका घेत अपक्ष म्हणून अर्ज भरून शक्तिप्रदर्शन केले होते.

मात्र, माघारीच्या अंतिम टप्प्यात सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी जोरदार हालचाली करत बहुतांश बंडखोरांचे बंड मोडण्यात यश मिळविले आहे. काही मोजके अपवाद वगळता नाराज इच्छुकांना मनधरणी करून किंवा राजकीय तोडगा काढून माघारीस भाग पाडण्यात पक्ष यंत्रणा यशस्वी ठरल्या आहेत.

तरीदेखील, माघारीनंतरचे चित्र पाहता पुण्यातील निवडणूक अत्यंत चुरशीची आणि बहुकोनी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बहुतांश प्रभागांमध्ये २० ते ४० उमेदवार अंतिम रिंगणात असल्याने मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे.

माघारीनंतर प्रभागनिहाय स्थिती पाहिली असता, प्रभाग क्रमांक १ मध्ये ३६, ३ मध्ये २१, ४ मध्ये २७, ५ मध्ये २१, ७ मध्ये ३४, ८ मध्ये २८, ९ मध्ये २२, १० मध्ये २५, ११ मध्ये २९, १२ मध्ये २५, १३ मध्ये ३४, १४ मध्ये ३३, १५ मध्ये ३८, १६ मध्ये २९, १८ मध्ये २२, २० मध्ये २०, २१ मध्ये ३३, २२ मध्ये ३८, २३ मध्ये ३३, २४ मध्ये ३९, २५ मध्ये २३, २६ मध्ये ४०, २८ मध्ये ३२, २९ मध्ये १६, ३० मध्ये १९, ३१ मध्ये १५, ३२ मध्ये २५, ३३ मध्ये २२, ३४ मध्ये २०, ३६ मध्ये २२, ३७ मध्ये २७, ३८ मध्ये ३६, ३९ मध्ये २२, ४० मध्ये २७ आणि ४१ मध्ये २७ उमेदवार अंतिम यादीत आहेत.

विशेष म्हणजे, प्रभाग क्रमांक २ आणि ६ मध्ये प्रत्येकी ४३ उमेदवार, तर प्रभाग क्रमांक १७ मध्ये ४१ आणि प्रभाग क्रमांक १९ मध्ये ४० उमेदवार रिंगणात असल्याने प्रशासनास या प्रभागांतील प्रत्येक मतदान केंद्रावर पाच ईव्हीएम लावण्याची तयारी करावी लागणार आहे. उमेदवारांची संख्या अधिक असल्याने मतदारांसमोरही मोठे आव्हान उभे राहणार आहे.

दरम्यान, प्रभाग क्रमांक ३५ मध्ये दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने, उर्वरित दोन जागांसाठी केवळ ७ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे या प्रभागात तुलनेने निवडणूक शांततेत पार पडण्याची शक्यता आहे.
एकीकडे बंडखोरीवर नियंत्रण मिळविण्यात पक्षांना यश आले असले, तरी दुसरीकडे उमेदवारांची मोठी गर्दी आणि मतांचे संभाव्य विभाजन पाहता पुणे महापालिका निवडणूक अत्यंत अटीतटीची, चुरशीची आणि रंगतदार ठरणार, हे निश्चित झाले आहे.