January 16, 2026

हिंदी गीता ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठीतील समृद्ध ज्ञानपरंपरा हिंदीत आणण्याचा यशस्वी प्रयत्न

पुणे, दि. २ ऑगस्ट, २०२४ : हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेत एक सेतूबंध बांधण्याच्या हेतूने पुण्यातील गुरुकुल प्रतिष्ठानने सिद्ध केलेला हिंदी गीता ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठीतील समृद्ध ज्ञान परंपरा हिंदीत आणण्याचा यशस्वी प्रयत्न असल्याचे प्रतिपादन उत्तर प्रदेश सरकारच्या हिंदी समिती प्रमुख डॉ. अमिता दुबे यांनी केले. गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या हिंदी गीता ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे प्रकाशन डॉ. दुबे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

कर्वे रस्त्यावरील स्वामीकृपा सभागृह येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात हिंदी गीता ज्ञानेश्वरीचे अनुवादक डॉ. वेदकुमार वेदालंकार, गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत, कार्याध्यक्ष कृष्णा राजाराम अष्टेकर, प्रतिष्ठानचे स्नेही रमेश कोपरकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रकाशना आधी भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे शिष्य आणि किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं उपेंद्र भट यांचा अभंग गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

अनेक हिंदी शब्द हे खरेतर मराठीमधून हिंदीत आले आहेत. जर या शब्दांचा अभ्यास झाला तर हिंदी भाषिक अधिक चांगल्या प्रकारे मराठी भाषा समजू शकतील असे सांगत डॉ. अमिता दुबे म्हणाल्या, “लेखनाशी संबधित कोणतेही काम करायचे असेल तर कष्ट, समर्पणाची भावना आणि सदिच्छा असणे महत्त्वाचे असते. या सर्व गोष्टी गुरुकुल प्रतिष्ठानकडे असल्याने त्यांच्या हातून अशा पद्धतीचे काम होत आहे. गुरुकुल प्रतिष्ठानमध्ये सेवाभाव आहे याची प्रचीती या कामांमधून येते.”

उत्तर प्रदेश सरकारच्या हिंदी भाषा समितीने आजवर तब्बल आठशे ग्रंथांचे हिंदी अनुवाद केले असून यामध्ये इतिहास, पौराणिक कथा, कला, साहित्य, समाजशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र यांसोबतच धर्मशास्त्राशी संबंधित ग्रंथांचा समावेश आहे. भारतरत्न महामहोपाध्याय डॉ.. पांडुरंग वामन काणे यांनी लिहिलेल्या धर्मशास्त्राचा इतिहास या ग्रंथाच्या खंडाचाही यामध्ये समावेश असून हा ग्रंथ हिंदी भाषिक वाचकांच्या विशेष पसंतीस पडल्याची माहिती डॉ. दुबे यांनी दिली.

माझ्या हातून हिंदी गीता ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा अनुवाद होईल की नाही ही शंका सुरुवातीपासूनच होती मात्र संत ज्ञानेश्वरांनी दाखविलेला मार्ग आणि माझ्या पत्नीने माझ्यावर दाखविलेला विश्वास यांमुळे हे शिवधनुष्य मला पेलता आले, असे डॉ. वेदकुमार वेदालंकार यांनी नमूद केले. “दररोज १० ते १२ ओव्या अनुवादित करायच्याच नाहीतर संध्याकाळचे जेवण मिळणार नाही असे बायकोने बजावले होते, त्यामुळे हा ग्रंथ सिद्ध करता आला आणि मी एकही दिवस जेवण चुकविले नाही असे सांगत डॉ. वेदालंकार यांनी आपल्या दिवंगत पत्नीच्या आठवणींना उजाळा दिला.

आज महाराष्ट्रात भाषा समितीचा कारभार हा राजकारणी लोकांच्या हातात असून उत्तर प्रदेश सरकार हे राज्यभाषेला कशा पद्धतीने महत्त्व द्यायला हवे याचे उत्तम उदाहरण आहे असे सांगत डॉ. कामत म्हणाले, “गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही या आधी तुकाराम गाथा आणि दासबोध यांचे हिंदी अनुवाद केले आहेत. उत्तरेतील नागरिकांना महाराष्ट्राची ही परंपरा माहिती व्हावी हा यामागील महत्त्वाचा उद्देश आहेच, शिवाय मराठी जनांना देखील चांगली हिंदी भाषा अवगत व्हावी हा यामागील हेतू आहे. संत नामदेवांनीही हिंदी भाषेचे महत्त्व ओळखले होते. ती परंपरा आपल्याला पुढे चालवायची आहे. त्यासाठी मराठी भाषेतील उत्तमोत्तम साहित्य हे हिंदी भाषेत आणि हिंदी भाषेतील उत्तमोत्तम साहित्य हे मराठी भाषेत यायला हवे आहे.”

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य पं उपेंद्र भट यांचा भजनांचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ‘जय जय राम कृष्ण हरी…’ या जयघोषाने यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली. भारतरत्न पं भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेले ‘रूप पाहता लोचनी…’, ‘इंद्रायणी काठी…’, ‘रूप तुझे देवा दाखवी केशवा…’, ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा’ हे अभंग त्यांनी गायले.. यानंतर संत नामदेव महाराजांचा ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल…’ हा अभंग, संत एकनाथ महाराजांचा ‘माझे माहेर पंढरी…’ हा अभंग त्यांनी प्रस्तुत केला. संत पुरंदर दास यांनी लिहिलेले ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा…’ हे कन्नड भजन पं उपेंद्र भट यांनी सादर केले. ‘कृष्ण कृष्ण कहिये…’ या कृष्ण भजनाने त्यांनी समारोप केला. आनंद अभ्यंकर (तबला), प्रभाकर पांडव (संवादिनी), देवव्रत भातखंडे (गायन), अनमोल थत्ते, नागेंद्र पांचाळ (गायन व टाळ) यांनी साथसंगत केली. शुभदा वर्तक यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. जाई कामत यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. डॉ. अशोक कामत यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.