पुणे, १४/०३/२०२३: कृष्णा नदीमध्ये दुषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्यूमुखी पडल्याचे प्रकरण आता राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात पोहोचले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अॅड.असीम सरोदे यांच्या मदतीने सोमवार दिनांक १३ मार्च २०२३ रोजी दाखल केलेल्या पर्यावरणहित याचिकेत साखर कारखाना, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना प्रतिवादी करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी व पर्यावरण रक्षणासाठी केलेल्या याचिकेत अॅड.असीम सरोदे यांच्यासह अॅड.गौतम रमाकांत कुलकर्णी, अॅड. सुघांशी रोपिया इत्यादी न्यायालयीन काम बघत आहेत. अॅड.गौतम रमाकांत कुलकर्णी हे स्वतः सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील रहिवासी आहेत व त्यांना कृष्णा नदीतील प्रदूषणाचा हा जुना विषय तसेच दरवर्षी निष्पाप मासे मोठ्या संख्येने मरणे याची पूर्ण माहिती आहे.
कृष्णा नदीपात्रात गेल्या काही दिवसापासून औद्योगिक वसाहत, साखर कारखान्यातून मळी मिश्रित पाणी विना प्रक्रिया सोडले जात असल्यामुळे आणि नदीतील वाहते पाणी कमी झाल्यामुळे नदीतील जलचर संकटात आले आहे. नदीतील पाणी प्रदुषित झाल्याने मासे मृत होत आहेत. प्रक्रिया न करता महानगरपालीकेद्वारे कृष्णा नदीत सांडपाणी सोडले जाते, कृष्णा नदीत प्रदूषण करण्र्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणतीही कारवाई करीत नाही आणि दरवेळी केवळ कारणे दाखवा नोटीस काढण्यात येते असा आरोप याचिकाकर्ते राजू शेट्टी यांनी याचिकेतून केलेला आहे. राजू शेट्टी यांच्यासह प्रकाशतात्या बालवडकर,अनिल बाळू मादनाईक, विश्वास बालीघाटे, शैलेश प्रकाश चौगुले,बाळगोंडा म्हदगोंडा पाटील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व स्वतः शेतकरी सुद्धा याचिकाकर्ते आहेत. हरिपूर येथे वारणा नदीचा संगम झाल्यानंतर हे ठिकाण असून नदीकाठाला मृत मासे येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. नदीपात्रामध्ये मृत माशांचा खच पडला होता. मृत माशे झुंडीने काठाला येत असल्याचे दिसून आले. यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
लहान माशापासून आठ-दहा किलो वजनाचे मासे देखील या ठिकाणी आता मृत झाल्याचे आढळून आले. दरम्यान, सांगलीतील प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ अवताडे यांना याबाबत विचारले असता त्यांनी माध्यमांना सांगितले, की नदी प्रदुषित होण्यामागील कारणांचा शोध घेण्यात येत आहे. खरे तर कारखान्यातील मळी कृष्णा नदीत सोडल्याने इतक्या मोठ्या प्रमाणात मासे मेलेत व जलचर जीवनाचा नाश झाला व जैवविविधता नष्ट झाली हे स्पष्ट असतांनाही साखर कारखान्याला कारवाई पासून अभय का? असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. मासे मेले त्या भागातील पाणी व सांगलीमध्ये शेरी नाला ज्या ठिकाणी नदीला मिळतो त्या ठिकाणच्या पाण्याचे नमुने प्रदूषण नियंत्रण मंडळाने तपासणीसाठी घेतले असून पाणी प्रदुषण होण्यामागील निश्चित कारण लवकरच स्पष्ट होइल. अंकली पूलाजवळ काही मृत माशेही मत्स्यविकास मंडळाच्या अधिकार्याकडून ताब्यात घेण्यात आले असून मासे मृत होण्यामागील कारण या तपासणीतून स्पष्ट होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. परंतु आता थेट पर्यावरण न्यायालयात याचिका दाखल झाल्याने संबधित अधिकाऱ्यांची जबादारी तसेच कारखान्याची व महानगरपालिकेची चिंता वाढली आहे.
या पर्यावरणहित याचिकेची सुनावणी येत्या आठवड्यात तातडीने राष्ट्रीय हरित न्यायाधिकारणाच्या (NGT) न्या.डी.के.सिंग व डॉ.विजय कुलकर्णी यांच्या समक्ष होईल आणि पर्यावरणाची हानी, मास्यांच्या मृत्यूसाठी जबादार असलेल्या प्रत्येकाच्या बेजबाबदारपणाचा हिशोब होईल असे अॅड.असीम सरोदे यांनी सांगितले.
More Stories
मुलाने पाच लाख बुडवले : जामीनदार बापाला एक वर्षाच्या कारावसासह दहा लाखाची भरपाईची शिक्षा
जमात-ए-इस्लामी हिंद महिला विभाग पुणेतर्फे लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘नैतिकता मोहीम’ सुरू
‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे शुक्रवारी (ता. १३) आयोजन