पुणे, २० जानेवारी २०२६: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात होत असलेल्या ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ या ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही महानगरांमधील भिंती अक्षरशः बोलक्या झाल्या आहेत. शहराचे सौंदर्य वाढवण्यासोबतच नागरिकांमध्ये खेळाप्रती उत्साह निर्माण करण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या पुढाकारातून ठिकठिकाणी आकर्षक आणि अर्थपूर्ण भित्तिचित्रे साकारण्यात आली आहेत. त्यामुळे रस्ते केवळ रहदारीचे मार्ग न राहता, ते मुक्त कलादालनाचे स्वरूप घेत असल्याचे चित्र दिसत आहे.
जागतिक आणि भारतीय खेळाडूंचा गौरव
या भित्तिचित्रांमध्ये सायकलिंगसह विविध खेळांतील आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा गौरव करण्यात आला आहे. २०२० चा रोड वर्ल्ड चॅम्पियन असलेली इटलीची एलिसा बालसामो हिचे चित्र क्रीडाप्रेमींचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. तसेच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणारे पहिले भारतीय रोड सायकलपटू अरविंद पवार यांचे भित्तिचित्र तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.
२०२५ च्या ट्रॅक आशिया कपमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या हर्षिता जाखड यांचे चित्र ‘वुमन पॉवर’चा संदेश देत असून, देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या अल्ट्रा-सायकलपटू कबीर यांच्या संघर्षाची गाथाही रंगरेषांमधून उलगडण्यात आली आहे.
खेळ आणि संस्कृतीचा सुरेख संगम
भित्तिचित्रांमध्ये केवळ खेळाडूंचेच नव्हे, तर महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचेही दर्शन घडते. एका बाजूला ‘वारी’ आणि पारंपरिक वेशभूषेतील स्त्री-पुरुषांची चित्रे, तर दुसऱ्या बाजूला बास्केटबॉल, वेटलिफ्टिंग, योग आणि टेनिस खेळणाऱ्या महिलांची चित्रे ‘Women of Pune’ या संकल्पनेखाली साकारण्यात आली आहेत. ‘भारतातील पहिली जागतिक सायकलिंग स्पर्धा’ असा ठळक उल्लेख असलेली ही भित्तिचित्रे पुण्याला जागतिक क्रीडा नकाशावर नेण्याचा संदेश देत आहेत.
प्रशासनाचा पुढाकार, नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमार्फत हा शहर सौंदर्यीकरण प्रकल्प राबवण्यात आला आहे. सिमेंटच्या निर्जीव भिंतींवर उमटलेले रंग, कला आणि संस्कृतीचे हे दर्शन नागरिकांकडून विशेष कौतुकास्पद ठरत आहे. सायकलिंग, चालणे आणि व्यायाम करणाऱ्या नागरिकांसाठी यामुळे प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले आहे.
“शहरातील भिंतींवर आपले खेळाडू आणि आपली संस्कृती पाहताना अभिमान वाटतो. यामुळे केवळ शहराचे रूप बदलले नाही, तर खेळाविषयीची जागृतीही वाढली आहे,” अशी प्रतिक्रिया एका स्थानिक नागरिकाने व्यक्त केली.
‘बजाज पुणे ग्रँड टूर’च्या निमित्ताने साकारलेला हा कलेचा आविष्कार पुणेकरांसाठी एक अनोखी पर्वणी ठरत असून, क्रीडा उत्सवासाठी शहरात सकारात्मक आणि उत्साही वातावरण निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

More Stories
Pune: मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन सूचना
तिकीट स्कॅन केल्यावरच उघडणार मेट्रो स्थानकावरील AFC गेट्स; पुणे मेट्रोचा महत्त्वाचा निर्णय
Pune: ई-चलनाविरोधात ५ मार्चपासून वाहतूकदारांचे बेमुदत आंदोलन