पुणे, दि.14 जून 2023 – महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित व बीसीसीआयच्या मान्यतेनेखाली होत असलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेला आज गुरुवार दिनांक 15 जून 2023 रोजी प्रारंभ होत आहे.
पुणेरी बाप्पा, कोल्हापूर टस्कर्स, ईगल नाशिक टायटन्स, छत्रपती संभाजी किंग्ज, रत्नागिरी जेट्स आणि सोलापूर रॉयल्स हे सहा संघ साखळी (लीग फॉरमॅट) पद्धतीने एकमेकांशी झुंजणार असून गुरुवार दिनांक 29 जून रोजी स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.
स्पर्धेतील सर्व सामने पुण्याजवळील गहुंजे येथील एमसीएच्या स्टेडियमवर खेळविले जाणार असून दुपारी 2 व रात्री 8 वाजता सामने होणार आहेत. स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी सर्व प्रेक्षकांना विनामूल्य मुक्त प्रवेश असून टेलिव्हिजनवरून दूरदर्शन डीडी वाहिनीवर, तसेच फॅनोड या स्ट्रीमिंगवरूनही हे सामने पाहता येणार आहेत.
रंगतदार प्रारंभ ऋतुराज गायकवाडचा पुणेरी बाप्पा आणि केदार जाधवचा कोल्हापूर टस्कर्स या संघांमध्ये उद्या रात्री 8 वाजता उद्घाटनाची लढत रंगणार आहे. अनुभवी नौशाद शेख व अंकित बावणेसह सचिन धस, साहिल औताडे असे युवा खेळाडू असलेल्या कोल्हापूर संघासमोर संतोष जेधे यांचे मार्गदर्शन लाभलल्या पुणे संघाचे आव्हान असणार आहे.
पुणे संघात ऋतुराजसह यष्टिरक्षक सूरज शिंदे, पवन शाह, यश क्षीरगासर व अष्टपैलू रोहन दामले यांचा समावेश आहे. पहिल्या सामन्यापूर्वी दुपारी 5.30 वाजता शानदार उद्घाटन सोहळ्याने स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या सोहळ्यात अमृता खानविलकरसह अनेक तारे-तारकांचा समावेश आहे.
खेळाडूंसाठी व्यासपीठ
एमसीएल स्पर्धेमुळे महाराष्ट्राच्यातील खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी उत्कृष्ट व्यासपीठ मिळणार असून त्यांच्यासाठीच ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे, असे सांगून एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार म्हणाले, की बीसीसीआयकडून या स्पर्धेसाठी आम्हाला छोटासा कालावधी मिळाला आहे. परंतु विविध फ्रेंचाइजींकडून, संघमालकांकडून मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे आम्ही ही स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करीत आहोत. युवा खेळाडूंसाठी हे आदर्श व्यासपीठ ठरेल.
आयकॉन खेळाडू
या स्पर्धेपूर्वी प्रत्येक संघाने एका आयकॉन खेळाडूची निवड केली आहे. प्रवीण मसालेवाले यांच्या मालकीच्या पुणे संघाने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडची निवड केली आहे. पुनीत बालन यांच्या मालकीच्या कोल्हापूर संघाने विश्वचषक संघातील केदार जाधवची, ईगल इंडिया इन्फ्रा यांच्या मालकीच्या नाशिक संघाने आंतरराष्ट्रीय खेळाडू राहुल त्रिपाठीची निवड केली आहे.
वेंकटेश्वरा हॅचरीजच्या मालकीच्या छत्रपती संभाजी किंग्ज संघाने 19 वर्षांखालील राजवर्धन हंगर्गेकरची, तर कपिल सन्स एक्सप्लोसिव्हज एलएलपी यांच्या मालकीच्या सोलापूर रॉयल्स संघाने युवा विकी ओस्तवालची, तर जेटसिंथेसिस याच्या मालकीच्या रत्नागिरी संघाने अझिम काझीची निवड केली आहे. महिलांच्या तीन प्रदर्शनीय एमपीएल लढतींचे येत्या 25, 27 व 28 जून रोजी आयोजन करम्यात आल्याचे सांगून रोहित पवार म्हणाले, की या महिला एमपीएल लढती सकाळी होतील. पुढच्या वर्षीपासून चार संघांच्या महिलांच्या एमपीएलचेही आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
चुरशीचा लिलाव
या स्पर्धेपूर्वी पुणे येथे पार पडलेली लिलाव प्रक्रिया अत्यंत चुरशीची झाली. तीन गटांमध्ये खेळाडूंची विभागणी केली होती. अ गट- रणजी खेळाडू – मूळ किंमत 60 हजार रुपये, ब गट- 19 वर्षांखालील व अन्य खेळाडू- मूळ किंमत 40 हजार रुपये व क गट- बाकी खेळाडू – मूळ किंमत 20 हजार रुपये. एकूण 285 खेळाडूंमधून 128 खेळाडूंची निवड करण्यात आली.
प्रत्येक संघाला कमाल 20 लाख रुपये रकमेत किमान 16 व कमाल कितीही खेळाडू घेता येणार होते. कोल्हापूरने 16, तर पुणे संघाने 27 खेळाडू निवडले. कोल्हापूरचा नौशाद शेख (6लाख रु.) सर्वात महागडा खेळाडू ठरला. तसेच कोल्हापूरने अंकित बावणेलाही 2.8 लाख रुपयांता खरेदी केले.
रत्नागिरीने दिव्यांग हंगर्गेकरसाठी दुसऱ्या क्रमांकाची (4.6लाख), तर सोलापूरने डावखुरा फिरकी गोलंदाज सत्याजित बच्छावसाठी 3.6 लाख रुपये मोजले. नाशिकने अष्टपैलू सिद्धेश वीरसाठी 2.6लाखांची बोली लावली.
दर्जेदार यष्टिरक्षकांसाठी प्रत्येक संघाने बोली लावली. कोल्हापूरने साहिल औताडेसाठी 3.8 लाख, रत्नागिरीने निखिल नाईकला 3.4 लाख, तर सोलापूर व नाशिकने अनुक्रमे ऋषभ राठोड व मंदार भंडारी यांना प्रत्येकी 1.8 लाख रुपयांत खरेदी केले. छत्रपती संभाजी किंग्जने सौरभ नवलेला 2.8 लाखांत, तर पुणेरी बाप्पा संघाने सूरज शिंदेला 2.4 लाखांत खरेदी केले. एमपीएल स्पर्धेचे 2011 नंतर पहिल्यांदाच पुनरागमन होत असून सर्व संघांनी लिलावातून मिळालेल्या खेळाडूंबद्दल समाधान व्यक्त केले.
More Stories
डेकॅथलॉनच्या १० कि. शर्यतीचे २७ ऑक्टोबर रोजी पुण्यात आयोजन
दहाव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत इम्पेरियल स्वान्स, साइनुमेरो जालन गोशॉक, ऑप्टिमा फाल्कन्स संघांची विजयी सुरुवात
चौथी हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष आंतरविभागीय स्पर्धा उद्यापासून