January 19, 2026

यंदाचे ‘एम्प्रेस गार्डन पुष्प प्रदर्शन’ पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांना समर्पित

पुणे, १९ जानेवारी २०२६: पुण्यातील ऐतिहासिक एम्प्रेस गार्डनमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य एम्प्रेस गार्डन पुष्प प्रदर्शन २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. २३ ते २७ जानेवारी २०२६ या कालावधीत होणाऱ्या या प्रदर्शनास या वर्षी ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ व पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांच्या स्मृतीस समर्पित केले आहे, अशी माहिती आज पत्रकार परिषदेत सुमन किर्लोस्कर (अध्यक्ष, प्रदर्शन समिती) आणि सुरेश पिंगळे (उपाध्यक्ष, प्रदर्शन समिती) यांनी दिली.

प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन शुक्रवार, २३ जानेवारी दुपारी १२ वाजता पुण्याचे पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्या हस्ते होणार असून, उद्घाटनानंतर डॉ. गाडगीळ यांच्या स्मरणार्थ विशेष श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

मुख्य आकर्षणे:

कलात्मक पुष्परचना: जपानी पद्धतीतील (इकेबाना) पुष्परचना आणि विविध प्रकारचे बोन्साय वृक्ष या वर्षीच्या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत.

राज्यस्तरीय सहभाग: पुणेसह कोल्हापूर, सांगली, नाशिक आणि इतर राज्यांतील नामांकित नर्सरी व्यावसायिक या प्रदर्शनात सहभागी होत आहेत.

विविध स्पर्धा: फुलांची मांडणी, फळे-भाजीपाला स्पर्धा आणि कुंड्यांच्या स्पर्धा यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही.

विद्यार्थ्यांचा सहभाग: नुकत्याच झालेल्या चित्रकला व हस्ताक्षर स्पर्धेत ८०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.

प्रदर्शनाची वेळ:

२३ जानेवारी: दुपारी १ ते सायंकाळी ७

२४ ते २७ जानेवारी: सकाळी ९ ते सायंकाळी ७

प्रदर्शनाचा उद्देश जनमानसात निसर्गाची ओढ आणि पर्यावरणाविषयी प्रेम निर्माण करणे हा आहे. तर ‘अॅग्री-हॉर्टीकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया’ या संस्थेच्या वतीने सर्व निसर्ग आणि पुष्पप्रेमींना या प्रदर्शनाचा आनंद घेण्यासाठी आणि डॉ. माधव गाडगीळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.