पुणे, दि. १२ मार्च, २०२५ : आज अनेक तरुण अमली पदार्थांचे सेवन करण्याच्या आहारी गेले असल्याचे पाहून वेदना होतात. अमली पदार्थांचा वाढता वापर हा सध्या सर्वांसाठीच चिंतेचा विषय आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.
पुणे हे आपल्या सांस्कृतिक ओळख आणि समृद्ध वारसा यासाठी जगभरात ओळखल्या जाते, मात्र गेल्या काही वर्षांत अमलीपदार्थ मिळण्याचे आणि सेवन करण्याचे प्रणाम लक्षणीयरीत्या वाढले असून यामुळे तरुण पिढीचे भविष्य धोक्यात येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. हेच लक्षात घेत ही परिस्थिती सुधारण्यासाठी आणि सांस्कृतिक पुणे हा वारसा जपण्यासाठी कोथरूड मधील विविध संघटनांनी एकत्र येत ‘ड्रग्ज मुक्त कोथरूड’ अभियान हाती घेतले असून या अभिमानाला आज पाटील यांच्या उपस्थितीत कोथरूड येथील करिष्मा चौकातील हुतात्मा बाबू गेनू स्मारकापासून औपचारिक सुरुवात झाली, त्यावेळी ते बोलत होते.
पराग ठाकूर, मकरंद टिल्लू नार्कोटिक्सचे निखील पिंगळे हे मान्यवर देखील उपस्थित होते. कार्यक्रमाची संकल्पना व संयोजन अंकुर प्रतिष्ठानचे कुलदीप सावळेकर व अॅड. मीताली सावळेकर, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे सुधीर थोरात, शिवश्री प्रतिष्ठानचे सागर शेडगे, अखिल भारतीय पूर्वसैनिक सेवा परिषदचे प्रदीप बापट आणि अग्रेसर भारत संस्थेचे विनीत गाडगीळ यांची होती.
‘ड्रग्ज मुक्त कोथरूड’ अभियाना अंतर्गत ड्रग्ज विरोधात जागरूकता निर्माण करणे, तरुणांना सकारात्मक मार्गदर्शन करीत त्यांना विधायक कार्यक्रमांशी जोडून घेणे, नागरिकांना ड्रग्ज मुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी प्रेरित करणे आदींचा समावेश असणार आहे.
अमली पदार्थ विरोधी लढा अधिकाधिक तीव्र करण्यासाठी आपण सर्वांनीच कटिबद्ध राहिले पाहिजे असे सांगत पाटील म्हणाले, “कोथरुड हे माझं घर असल्याने माझं घर स्वच्छ ठेवण्यासाठी मी आग्रही आहे. आज कोथरुड मधील सूज्ञ नागरिकांनी एकत्र येऊन अमली पदार्थमुक्त कोथरुडचा संकल्प केला. यामध्ये सहभागी होत आज अमली पदार्थमुक्त कोथरूडची प्रतिज्ञाही केली तसेच, अमली पदार्थ विरोधी लढ्यात सर्वस्व पणाला लावून काम करण्याची ग्वाही दिली आहे.”
ड्रग्ज मुक्त कोथरूड संकल्पना मांडताना जे या विळख्यामध्ये अडकले आहेत त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी लवकरच एक क्लिनिक सुरु करण्यात येईल. तसेच या विषयातील सर्व कामकाज बघण्यासाठी एक स्वतंत्र ऑफिस तेथेच असेल असेही पाटील यांनी यावेळी जाहीर केले. याचबरोबर शालेय अभ्यासक्रमामध्ये व महाविद्यालयीन एनईपीमध्ये याचा समावेश करण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित नार्कोटिक्स डिपार्टमेंटचे निखील पिंगळे यांनी या प्रश्नाचे समूळ उच्चाटन करण्याकरिता प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे सांगितले
कुलदीप सावळेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सुधीर थोरात यांनी प्रास्ताविक केले. सागर शेडगे यांनी आभार मानले तर ॲड् मीताली सावळेकर यांनी उपस्थितांना ड्रग्ज मुक्त कोथरूड अभियानाची प्रतिज्ञा दिली.
More Stories
माजी आमदार रवींद्र धंगेकरांवर समीर पाटीलने दाखल केला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
“बोट घातलं तर हात घालू, ॲक्शनला रिऍकशन मिळणार!” – अमित ठाकरे यांचा अभाविपला इशारा
Pune: अनधिकृत फ्लेक्सचा दंड नसल्यास उमेदवारी अर्ज बाद; उमेदवारांना घ्यावी लागणार एनओसी