October 13, 2024

पुणेकर कलारसिकांना ‘व्हीनस आर्ट फेस्ट’ची मेजवानी; ९ ते ११ जून दरम्यान आयोजन

पुणे, दि. ८ जून, २०२३ : चित्रप्रदर्शनासोबतच, पोट्रेट, वॉटरकलर प्रकारच्या चित्रांची रेखाटने, प्रात्यक्षिके आणि प्रतिथयश कलाकारांना भेटण्याची संधी असलेला ‘व्हीनस आर्ट फेस्ट’ पुणेकर कलारसिकांना अनुभविता येणार आहे. सुरेंद्र करमचंदानी यांच्या संकल्पनेतून आणि आर्ट पुणेचे संजीव पवार यांच्या पुढाकाराने सदर कलामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शुक्रवार दि ९ जून ते रविवार दि ११ जून, २०२३ दरम्यान सकाळी ११ ते सायं ७ पर्यंत घोले रस्यावरील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे महोत्सव संपन्न होईल. महोत्सव सर्व कलारसिकांना विनामूल्य खुला आहे याची कृपया नोंद घ्यावी.


शुक्रवार दि. ९ जून रोजी सकाळी ११ वाजता व्हीनस आर्ट फेस्टचे उद्घाटन सुप्रसिद्ध पेपर मॅशे कलाकार भारती पित्रे व उद्योजक अजय पित्रे यांच्या हस्ते होईल. सुप्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे हे देखील या वेळी उपस्थित असतील. उद्घाटनानंतर प्रमोद कांबळे व्यक्तिचित्र या चित्रकलेतील प्रकारचे प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. शिवाय पु ल देशपांडे यांची सही असलेल्या १९१९ या नव्या पेनच्या मॉडेलचे अनावरण यावेळी होईल.

पुण्यासारख्या शहरात कलाकार, कलाप्रेमी, कला शाखेचे विद्यार्थी आदींना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच यासंबंधीची रेखाटने, प्रात्यक्षिके यांचे आयोजन करीत एक संवाद प्रास्थापित व्हावा या उद्देशाने २०१३ सालापासून सदर कलामहोत्वाचे आयोजन करण्यात येत आहे. पुण्यातील कलाप्रेमींचे हक्काचे ठिकाण असलेले व्हीनस ट्रेडर्स हे येत्या १० जून रोजी ५० व्या वर्षांत पदार्पण करीत असताना यावर्षीचा हा महोत्सव खास असल्याचे सुरेंद्र करमचंदानी यांनी आवर्जून सांगितले. महोत्सवाच्या तीनही दिवशी भगवद्गीता आणि वाल्मिकी रामायण हे ग्रंथ अनोख्या पुस्तक संचाच्या स्वरूपात उपस्थितांना पाहता येतील, अशी माहितीही त्यांनी दिली.  याबरोबरच रविवार दि ११ जून रोजी चिंटूचे निर्माते असलेले चारुहास पंडित हे चिंटूच्या मॅस्कॉट सोबत उपस्थितांना चित्रकलेचे प्रात्यक्षिक दाखवतील. हे प्रात्यक्षिक विनामूल्य असेल.