यंदाचे वर्ष हे महोत्सवाचे १० वे वर्ष असून गुरुवार दि. ६ जून रोजी सायं ५.३० वाजता कलाप्रेमी आणि कला संग्राहक अजित गाडगीळ आणि कलाविषयाचे सुप्रसिद्ध तज्ज्ञ व कला शिक्षक डॉ सुधाकर चव्हाण यांच्या हस्ते घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा कला दालन येथे महोत्सवाचे उद्घाटन होईल.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महोत्सवात कला प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, अनेकविध कार्यशाळा यांची रेलचेल असेल असे सांगत महोत्सवाचे आयोजक सुरेंद्र करमचंदानी म्हणाले, “कलाक्षेत्राशी निगडीत असल्याने कलाकार आणि विशेषतः कलाकारांच्या नव्या पिढीसोबत आमचा कायमच संपर्क येत असतो. या सर्वांसाठी हे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, यासाठी १० वर्षांपूर्वी आम्ही व्हीनस कला महोत्सवाला सुरुवात केली. व्यावसायिक कलाकार, हौशी कलाकार, कला शाखेचे विद्यार्थी आणि शालेय विद्यार्थी यांसाठी या दरम्यान आम्ही अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असतो. शिवाय या वेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या अशा उल्लेखनीय चित्रांचे प्रदर्शन देखील आपण भरवित असतो. याही वर्षी असेच आयोजन महोत्सवा दरम्यान करण्यात आले आहे. शिवाय सुलेखन आणि मराठी व इंग्रजी भाषेतील सुलेखन स्वाक्षरी यांचे प्रात्यक्षिक या महोत्सवात पुणेकर कलाप्रेमींना पाहता येणार आहे.”
महोत्सवा दरम्यान होणाऱ्या कार्यशाळेमध्ये शनिवार दि. ८ जून रोजी सकाळी ११ वाजता चित्रकला विषयातील एलिमेंटरी व इंटरमिजिएट या परीक्षांचे महत्व लक्षात घेत, त्यांविषयी जनजागृती आणि माहितीपर शिक्षण विद्यार्थी व पालकांना मिळावे, या उद्देशाने या विषयातील तज्ज्ञांची विशेष कार्यशाळा संपन्न होणार आहे.
याबरोबरच ‘ग्लोबल चाइल्ड प्रोडिजी’ पुरस्काराने सन्मानित अद्वैत कोलारकर या बालचित्रकाराचे मोफत मार्गदर्शन उपस्थितांना घेता येईल. अद्वैत वयाच्या दुसऱ्या वर्षांपासून चित्र काढत असून आज जागतिक स्तरावर त्याच्या चित्रांना पसंती मिळत आहे. अद्वैत याने आजवर १५ एकल तर ४ समूह शोज केले आहेत. अद्वैत कोलारकर या महोत्सवात एक विशेष कार्यशाळा घेणार असून रविवार दि. ९ जून रोजी सकाळी ११ वाजता ही संपन्न होईल. एलिमेंटरी व इंटरमिजिएट या परीक्षांचे महत्व सांगणारी कार्यशाळा आणि अद्वैत कोलारकार यांची कार्यशाळा या दोन्ही सर्वांसाठी विनामूल्य खुल्या आहेत.
महोत्सवादरम्यान आयोजित चित्रकला स्पर्धेसाठी व्यावसायिक कलाकार, हौशी कलाकार, कला शाखेचे विद्यार्थी आणि शालेय विद्यार्थी या चार गटांमधून तब्बल ७०० चित्रांची नोंदणी आली असून, यांपैकी निवडक २०० चित्रे प्रदर्शनीमध्ये प्रदर्शित केली जातील. त्यानुसार प्रत्येक गटात तीन उत्कृष्ट चित्रांना रोख पारितोषिकेही देण्यात येतील, असेही करमचंदानी म्हणाले. यावर्षीच्या महोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे पुण्यातील व्हीनस ट्रेडर्स हे यावर्षी ५० वर्षे पूर्ण करीत आहे.
More Stories
माजी आमदार रवींद्र धंगेकरांवर समीर पाटीलने दाखल केला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
“बोट घातलं तर हात घालू, ॲक्शनला रिऍकशन मिळणार!” – अमित ठाकरे यांचा अभाविपला इशारा
Pune: अनधिकृत फ्लेक्सचा दंड नसल्यास उमेदवारी अर्ज बाद; उमेदवारांना घ्यावी लागणार एनओसी