अनिल धनवटे
पुणे, २ ऑक्टोबर २०२५ : “त्यांचे शरीर, आमचे नाही!”, “मांस म्हणजे खून!”, “दूध = गोमांस!” अशा ठाम घोषणा देत आज शेकडो कार्यकर्त्यांनी गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावरून (फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता) प्राण्यांच्या हक्कांसाठी मोर्चा काढला. ‘पुणे अॅनिमल लिबरेशन’ या संघटनेने आयोजित केलेल्या या शांततापूर्ण, पण प्रभावी मोर्च्यात प्रत्येक प्राण्याला त्याचे मूलभूत हक्क मिळावेत, ही मुख्य मागणी होती.
या मोर्चाचा उद्देश केवळ प्राणीमुक्तीची मागणी करणे नव्हता, तर प्रजातीवादाच्या विरोधात जनजागृती करणे हाही त्यामागे स्पष्ट हेतू होता. अन्न, वस्त्र, सौंदर्यप्रसाधने, मनोरंजन यांसारख्या मानवी गरजांमुळे प्राण्यांवर होत असलेल्या शोषणावर या मोर्चादरम्यान प्रकाश टाकण्यात आला.
कार्यकर्त्यांच्या हातात प्राण्यांच्या मुक्तीचे संदेश असलेले फलक होते आणि त्यांनी जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
प्रवीण गिरी, प्रमुख कार्यकर्ते, यांनी भाषणात सांगितले की, “प्राणी देखील माणसांप्रमाणेच संवेदनशील असतात – त्यांना वेदना, आनंद, दुःख जाणवतं. मात्र आपण त्यांच्याकडे केवळ संसाधन म्हणून पाहतो. हेच शोषणाचं मूळ कारण आहे. त्यांना वस्तूसारखं वापरणं बंद झालं पाहिजे.”
त्यांनी दुग्धव्यवसायातील कृत्रिम रेतन, वासरांना आईपासून दूर करणं, अंडी उद्योगातील कोंबड्यांवरील अमानुष वागणूक, तसेच प्राण्यांचा मनोरंजनासाठी वापर यावरही तीव्र टीका केली.
“प्राणी खाल्ले नाही तरी आपण निरोगी राहू शकतो”
कार्यकर्ता प्रसन्न इनामदार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “प्राण्यांनाही भावना असतात. आपण त्यांचा वापर आपल्या चवेसाठी, कपड्यांसाठी किंवा इतर स्वार्थासाठी करू नये. मांस खाल्लं नाही, दूध प्यायलं नाही तरी आपण निरोगी राहू शकतो – विज्ञान आणि वैद्यकीय संशोधन याचे अनेक दाखले देतात.”
या मोर्च्यात युवक, वृद्ध, विद्यार्थी, पालक आणि विविध पार्श्वभूमीतील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. समाजाला प्राण्यांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य व्हावे, त्यांना हक्क मिळावेत, यासाठी ही हालचाल आणखी तीव्र करण्याचा निर्धारही कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही