March 3, 2026

बारावीच्या लेखी परीक्षांना आजपासून सुरुवात; पुण्यात विद्यार्थ्यांचे औक्षण करून उत्साहात स्वागत

पुणे, १० फेब्रुवारी २०२६: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता १२ वीच्या लेखी परीक्षांना आजपासून राज्यभर सुरुवात झाली. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा आयोजित करण्यात आल्या असून राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे.

पुण्यातील भावे हायस्कूल येथे परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून, फुलांची उधळण करत आणि साखर वाटून स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांचा ताण कमी व्हावा आणि सकारात्मक वातावरणात परीक्षा द्यावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

इयत्ता १२ वीची लेखी परीक्षा आजपासून सुरू होऊन दि. १८ मार्चपर्यंत चालणार आहे. यंदा राज्यभरातून एकूण १५,३२,४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये ८,२०,२२९ मुले, ७,१२,२४० मुली आणि १८ ट्रान्सजेंडर विद्यार्थी सहभागी आहेत. राज्यातील १०,६६४ कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी ३,३८७ मुख्य परीक्षा केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

आज सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास भावे हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रवेश देताना मंडळाच्या नियमावलीनुसार तपासणी करूनच आत सोडण्यात आले. विद्यार्थ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या तसेच शिस्तबद्ध पद्धतीने परीक्षा प्रक्रिया पार पडली.

परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, “तयारी पूर्ण झाली असली तरी पहिला पेपर असल्यामुळे थोडं दडपण आहे. पण औक्षण आणि स्वागतामुळे आत्मविश्वास वाढला असून पेपर चांगला जाईल अशी अपेक्षा आहे.”

दरम्यान, सर्व परीक्षार्थ्यांना निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सकाळच्या सत्रासाठी स. १०.३० वाजता आणि दुपारच्या सत्रासाठी दु. २.३० वाजता परीक्षा दालनात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. पुण्यात अनेक विद्यार्थी वेळेआधीच केंद्रावर पोहोचले होते. त्यांचे औक्षण करून आणि शुभेच्छा देत स्वागत करण्यात आल्याने परीक्षेच्या पहिल्याच दिवशी आनंददायी वातावरण पाहायला मिळाले.