July 27, 2024

पुणे: येरवडा कारागृहात पुन्हा हाणामारी – चार कैद्यांवर गुन्हा

पुणे, २४/०६/२०२३: येरवडा कारागृहात पुन्हा कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी चार कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कारागृहातील वर्चस्वातून कैद्यांच्या दोन गटात हाणामारी झाल्याची घटना नुकतीच घडली होती.

या प्रकरणी प्रकाश विठ्ठल रेणुसे, विकास बाळासाहेब कांबळे, वैभव थिटे, तेजस बाळासाहेब बच्छाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कारागृह रक्षक कृष्णा वानोळे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवडा कारागृहातील सीजे विभागात पाण्याच्या हौदाजवळ कैदी रेणुसे, कांबळे, थिटे, बच्छाव यांचा सुजीत टाक याच्याशी वाद झाला. या कारणावरुन रेणुसे, कांबळे, थिटे, बच्छाव यांनी टाकला शिवीगाळ करुन त्याला प्लास्टिकच्या बादलीने मारहाण केली. मारहाणीत टाक जखमी झाला. पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे तपास करत आहेत.

येरवडा कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहे. कारागृहाची क्षमता अडीच हजार कैदी आहे. प्रत्यक्षात कारागृहात सात हजार कैदी आहे. क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवण्यात आल्याने कारागृहात कैद्यांमध्ये वाद होऊन हाणामारीच्या घटना घडतात. कारागृहातील वर्चस्वातून कैद्यांच्या दोन गटात हाणामारी झाल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी १६ कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.