December 14, 2024

पुणे: सायबर चोरट्याकडून तरुणीचीआठ लाखांची फसवणूक

पुणे, २४/०६/२०२३: क्रेडीट कार्डवरील व्यवहाराची मर्यादा वाढविण्याच्या आमिषाने तरुणीची आठ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्याने तरुणीच्या नावाने बँकेकडून ऑनलाइन कर्ज काढल्याचे उघडकीस आले आहे.

याबाबत एका तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी भारती विद्यापीठ भागात राहायला आहे. तिच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्याने काही दिवसांपूर्वी संपर्क साधला होता. आरोपीने एका खासगी बँकेतून बोलत असल्याची बतावणी तिच्याकडे केली होती. क्रेडीट कार्ड व्यवहाराची मर्यादा (लिमिट) वाढविण्यात येणार असल्याची बतावणी चोरट्याने केली हाेती. त्यानंतर चोरट्याने तरुणीचा पॅनकार्ड, तसेच बँक खाते क्रमांक घेतला.

या माहितीचा गैरवापर करुन ऑनलाइन पद्धतीने तरुणीच्या नावावर आठ लाखांचे कर्ज काढण्यात आले. कर्जाची रक्कम चोरट्याने स्वत:च्या बँक खात्यात वळविली. तरुणीच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुराणिक तपास करत आहेत.