September 10, 2024

पुणे: लव्ह जिहादची खोटी तक्रार- खोटी तक्रार देणारी मैत्रिण ताब्यात

पुणे, ११/०६/२०२३: प्रेमसंबंधातून २२ वर्षाच्या मैत्रिणीला दिल्लीला पळवून नेले असून, तिला तेथे डांबून ठेवले आहे. तिने लोकेशन पाठविले असल्याची तक्रार एका तरुणीने केली होती. आंतरधर्मीय प्रेमप्रकरणातून तरुणीचे अपहरण झाल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोेलिसांच्या पथकाने दिल्लीतून तरुणी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले. तेव्हा दिल्लीत ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणीने अपहरण झाले नसल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तक्रार देणाऱ्या मैत्रिणीची चौकशी केली. तेव्हा मैत्रिणीने पोलिसांना अद्दल घडविण्यासाठी खोटी तक्रार दिल्याचे निष्पन्न झाले.

तरुणीचे येरवडा भागात राहणाऱ्या सैफ नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. त्याने विवाहाचे आमिष दाखवून २९ मे रोजी पळवून नेल्याची तक्रार तरुणीने तिच्या मैत्रीणीकडे केली होती. सैफ विवाहित असून त्याने मला फसविले असून, दिल्लीत डांबून ठेवल्याची तक्रार मैत्रिणीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून केली होती, अशी तक्रार तरुणीच्या मैत्रिणीने पोलिसांकडे दिली होती.

आंतरधर्मीय प्रेमप्रकरणातून तरुणीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांना मिळाल्यानंतर तातडीने तपास सुरू करण्यात आला होता.

सैफ आणि तरुणीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक दिल्लीत रवाना करण्यात आले. तांत्रिक तपासात दोघे जण नोएडा भागात असल्याची महिती मिळाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. याबाबतची तक्रार मिळाल्यावर तातडीने दिल्लीला पोलीस उपनिरीक्षक दिलीप पालवे आणि कर्मचाऱ्यांचे पथक पाठविले. तेथे चौकशी केल्यावर हा सर्व उलघडा झाला. पुण्यात पोलिसांकडे तक्रार देणाऱ्या तरुणीच्या मैत्रिणीचे प्रेमसंबंध तुटले होते. तिचा प्रियकर तिला त्रास देत होता. तिने पाेलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला होता. पोलिसांनी तिला प्रतिसाद दिला नाही.

त्यामुळे ती पोलिसांवर चिडली होती. पोलिसांना अद्दल घडविण्यासाठी तिने मैत्रिणीचे अपहरण झाल्याची खोटी तक्रार दिली. पोलिसांचा विश्वास बसावा म्हणून तिने दिल्लीतील मैत्रिणीला काही न सांगता तिचे लोकेशन मागवून घेतले होते, असे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी सांगितले.